शर्माजी का बेटा हुशार, रोहित-राहुलच्या शतकाने भारत विजयी

क्रिकेट विश्वचषक २०१९: रोहित शर्माचे पाचवे शतक व राहुलच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने केले लंकेला पराभूत

लीड्स: काल रात्री पडलेला पाऊस, सकाळपासून असलेला ढगाळ वातावरण, सामन्यादरम्यान आकाशातून चित्र-विचित्र बॅनर घेऊन घिरकणारे विमान. अश्या नाट्यमय घडामोडींत घडलेल्या सामन्यात भारताने ‘दुबळ्या’ श्रीलंकेचा सात गडी व ३९ चेंडू राखत पराभव करीत साखळी सामन्यांची विजयी सांगता केली. भारताने जरी अंकतालिकेत पहिले स्थान मिळवले असले तरी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर भारताचा उपांत्य फेरीचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे.

२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत निवड न झालेल्या रोहित शर्माचं एक ट्विट सध्या वायरल होतंय. निराश असलेला रोहित आपने मेहनत करून नक्कीच संघात येऊ असा ट्विट होता. आज त्याचा ‘फेव्हरेट’ संघ श्रीलंका समोर होता. टार्गेट होतं ते २६५ धावांचं. मग काय, रोहितने अगदी पहिल्याच षटकापासून जी सुरुवात केली ते नव-नवे विक्रम प्रस्थापित करण्यापर्यंत.

राहुलच्या जोडीने डावाची सुरुवात करीत ४१ चेंडूंतच संघाची पन्नाशी गाठून दिली आणि १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संघाला बिनबाद शंभरचा आकडा गाठून दिला. इतकी दमदार सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांना तर घामच फुटला. रोहितने आपला बर्मिंगहॅमचा फॉर्म लीड्सलाही कायम ठेवत विश्वचषकातले आपले पाचवे शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. लसिथ मलिंगा, धनंजया डी’सिल्वा, कसून रजिथा यांना अक्षरशः चोपून काढत राहुल-रोहित जोडी लंकेच्या गोलंदाजांवर हावी झाली. दोघांनी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ सलामी भागीदारी देत २५व्या षटकात भारताला १५० धावांचा पल्ला गाठून दिला. शतक पूर्ण झाल्यानंतर रजिथाच्या गोलंदाजीवर लगेचच रोहित (१०३) मिड-ऑफला उभ्या असलेल्या मॅथ्यूसकडे सोपा झेल देत बाद झाला.

एक बाजूने रोहितची तुफान फलंदाजी पाहत राहुलही उत्फुर्त झाला. चालू स्पर्धेत शतकापासून वंचित असलेल्या राहुलने रोहितच्या जोडीने लंकेच्या गोलंदाजांची पिसे काढत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. चांगली सुरुवात होऊन मोठ्या खेळी करण्यास अपयशी ठरलेल्या राहुलने एकदिवसीय कारकिर्दीतील आपले दुसरे व विश्वचषकातील पहिले शतक लगावले. राहुलने ११८ चेंडूंचा सामना करीत ११ चौकार व एका षटकारासह १११ धावांचा योगदान दिलं.

भारताने आपला टार्गेट अगदी सहजरित्या पार करीत विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामान्यांची सांगता विजयाने केली. कोहली (नाबाद ३४), रिषभ पंत (४), हार्दिक पांड्या (नाबाद ७) यांची छोट्या खेळीने भारताने ७ गडी व ३९ चेंडू राखत सहज विजय प्राप्त केला.

तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची कसलेली गोलंदाजी श्रीलंकेच्या आघाडीने आज चांगलीच अनुभवली. पाहिजे षटक निर्धाव टाकलेल्या जसप्रीत बुमराने करुणरत्नेला दहा धावांवर माघारी धाडत लंकेच्या डावाला खिंडार पडण्यास सुरुवात केली. आठव्या षटकात लगेचच दुसरा सलामीवीर कुसल परेराही (१८) धोनीकडे झेल देत धोनीकडे झेल देत तंबूत परतला. या विश्वचषकात आपला पहिला सामना खेळणाऱ्या जडेजाने कुसल मेंडिसला केवळ तीन धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात हार्दिक पांड्याने फर्नांडोला २० धावांवर बाद करीत लंकेची अवस्था चार बाद ५५ अशी केली. बाद झालेल्या पहिल्या चार गड्यांमध्ये धोनीचा मोठा हातभार होता. धोनीने या चार विकेट्समध्ये तीन झेल व एकाला यष्टिचित पकडलं.

मिळालेली भन्नाट सुरुवात दुसऱ्या पावरप्लेमध्ये टिकून ठेवण्यास भारत कुठेतरी कमकुवत पडला असे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. चौथा गडी १२व्या षटकात बाद झाल्यानंतर पाचव्या गड्यासाठी भारताला ३८व्या षटकाची वाट पाहावी लागली. अँजेलो मॅथ्यूस व लाहिरू थिरुमणे या जोडीने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी सुरुवातीस सावध पवित्रा घेत ८४ चेंडूंत पन्नास धावांची भागीदारी रचली. सेट झाल्यानंतर मिळालेल्या कमकुवत चेंडूंना सीमारेषेपलीकडे धाडत १३९ चेंडूंत शतकीय भागीदारी रचली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १५७ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी रचित डावाला आकार दिला. लंकेसाठी हि स्पर्धेतील सर्वोत्तम आघाडीही ठरली.

थिरुमणे (५३) तंबूत परतल्यानंतर धनंजया दी’सिल्वा सोबत ६४ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी रचित श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. दरम्यान, मॅथ्यूसने आपले तिसरे एकदिवसीय शतक झळकावले आणि उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्याला दाद दिली. श्रीलंकेने आपल्या निर्धारित ५० षटकांत सात गडी गमावत २६४ धावा धावफलकावर लगावलया. भारताकडून बुमराने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका: २६४/७ (५०) – अँजेलो मॅथ्यूस ११३ (१२८), लाहिरू थिरुमणे ५३ (६८), जसप्रीत बुमरा १०-२-३७-३

भारत: २६५/३ (४३.३) – केएल राहुल १११ (११८), रोहित शर्मा १०३ (९४), कसून रजिथा ८-०-४७-१

भारत सात गडी व ३९ चेंडू राखत विजयी

रोहित शर्माचे आजच्या शतकानंतरचे विक्रम

  • एका विश्वचषकात सर्वाधिक शतके (५). श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा (२०१५) चार शतकांचा विक्रम रोहितने मोडीत काढत नव्या विक्रमला गवसणी घातली
  • विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या पंगतीत तो येऊन बसला आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांची बरोबरी रोहितने आज केली
  • एकदिवसीय सामन्यांत सलग तीन डावांत शतके मारणारा जगातील ११वा खेळाडू बनला तर भारताच्या विराट कोहलीनंतर केवळ दुसराच खेळाडू बनला. रोहितने बर्मिंघमला झालेल्या इंग्लंड व बांगलादेश यांच्याविरुद्धच्या सामन्यांत शतके झळकावली होती. आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही शतक लगावत त्याने हाही विक्रम आपल्या नवे केला
  • २०१५ च्या विश्वचषकानंतर रोहितचं हे २०वे शतक आहे. या कालावधीत सर्वाधिक शतके ठोकणारा रोहित शर्मा हा अव्वल फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या १९ शतकांना मागे टाकत त्याने ही कामगिरी केली आहे
]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *