लीड्स: विश्वचषक स्पर्धेत आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलला वेस्ट इंडिजच्या संघाने गोड निरोप देत अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात २३ धावांनी विजय मिळावीत अफगाणिस्तानला स्पर्धेत विजयापासून वंचितच ठेवले. विंडीजच्या मधल्या फळीचा धमाका व कार्लोस ब्रेथवेटची कामचलाउ गोलंदाजी आज चांगली कामी आली.
तळाच्या दोन संघांमध्ये आपला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेतील शेवटचा सामना खेळण्यास उतरलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात इंग्लिश प्रेक्षकांनी चांगलीच हजेरी लावली. येथील यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या या सामन्यात जेसन होल्डरने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावत प्रथम फलंदाजी स्वीकारली. शिवाय विंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलं विश्वचषक स्पर्धेतील आपला शेवटचा सामना खेळत असल्यामुळे सामना आणखी महत्वाचा होता.
सर्व काही सुरळीत असतानाही वेस्ट इंडिज या स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ दाखवता नव्हता तर दुसरीकडे आपला दुसराच विश्वचषक खेळणारा अफगाणिस्तान संघ तुलनेत खूपच कमकुवत खेळला. ख्रिस गेलला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी खेळते ठेवत सहाव्या षटकात चालते केले. गेलने विश्वचषकाच्या आपल्या शेवटच्या डावात १८ चेंडूंत केवळ ७ धावा करीत निरोप घेतलं. गेलच्या परतल्याने दुसऱ्या गड्यासाठी इविन लुईस (५८) व शाई होप (७७) यांनी ८८ धावांची भागीदारी रचित संघाला सावरले.
क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात छोट्या-छोट्या भागीदारी संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जातात हा साधा सोपा नियम आहे. स्पर्धेमध्ये कदाचित हीच गोष्ट वेस्ट इंडिजला उशिरा समजली असावी. आजच्या सामन्यात त्यांनी दोन अर्धशतकीय व एक शतकीय भागीदारी रचित संघाला तिसऱ्यांदा तीनशेचा पल्ला गाठून दिला. शाई होप व शिमरॉन हेटमायर (३९) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची तर कर्णधार जेसन होल्डर (४५) व विंडीजचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ फलंदाज निकोलस पुरण (५८) यांनी पाचव्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी रचली. अफगाणिस्तानचे गोलंदाज आजही आपली जादू दाखवण्यास सपशेल फेल ठरले. मोहम्मद नबी (९ सामन्यांत १० बळी), रशीद खान (९ सामन्यांत ६ बळी) व मुजीब-उर-रहमान (७ सामन्यांत ७ बळी) ही तिकडी सर्वच संघांविरुद्ध कमी पडली. स्पर्धेआधी अफगाणिस्तानच्या या फिरकी जादूगारांकडून जे-जे मोठे भाकीत केले जात होते ते स्पर्धेत फोल ठरले. होप, हेटमायर व पुरण यांच्या अर्धशतकाच्या आणि कर्णधार होल्डरच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने आपल्या निर्धारित ५० षटकांत ३११ धावांचा पल्ला गाठला. वेस्ट इंडिजच्या डावाचं आणखी एक वैशिट्ये ठरलं ते म्हणजे त्यांची डेथ ओव्हर्समधली फटकेबाजी. शेवटच्या दहा षटकांत म्हणजेच ४१ ते ५० या ओव्हर्समध्ये त्यांनी तब्बल १११ धावा कुठल्या. आतापर्यंतच्या सामन्यांत अशी कामगिरी याआधी केवळ चार वेळेसच झाली होती.
स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात गडबडीत झाली. दुसऱ्याच षटकात केमार रोचने कर्णधार गुलबदिन नईबला (५) माघारी धाडत विंडीजसाठी दमदार सुरुवात करून दिली. पण विंडीजला दुसरा गडी बाद करण्यासाठी तब्बल २७व्या षटकाची वाट पाहावी लागली. रहमत शाह व १८ वर्षीय इक्राम अलिखीलने विंडीजच्या गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत शतकीय भागीदारी रचित धावांचा पाठलाग चालू ठेवला. दरम्यान, इक्राम अलिखीलने विश्वचषक स्पर्धेत एक डावात ८०हुन अधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा १९९२ चा विक्रम मोडीत काढला. रहमत (६२) व अलिखील (८६) यांनी २५ षटके खेळून काढत १३३ धावांची भागीदारी केली.
दरम्यान, विश्वचषकाचा आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने आज गोलंदाजीची केली. त्याने सहा षटके गोलंदाजी करीत अलिखीलला तंबूत धाडले. गेल जेव्हा गोलंदाजी करण्यास आला तेव्हाही उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. रहमत शाह बाद झाल्यानंतर नजीबुल्ला झरदान व अलिखील या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करीत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यात आणखी भर पडली ती वेस्ट इंडिजचे सुमार क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक शाई होप याने तर एक सोपी संधी सोडत अफगाणिस्तानला जीवनदान दिले.
अगदी ४० षटकांपर्यंत अफगाणिस्तान सामन्यात टिकून होता. पण, आजही नियतीने काही वेगळेच ठरवले होते. वेस्ट इंडिजने जिथे शेवटच्या दहा षटकांत ११ धावा कुठल्या, तिथे अफगाणिस्तान मात्र एका मागून एक विकेट टाकत होता. पाच बाद २२० अश्या स्थितीत असणारा अफगाणिस्तान ४५व्या षटकाअखेरीस आठ बाद २५५ अश्या दयनीय अवस्थेत आला होता. असघर अफघाण (४०) व नजीबुल्ला झरदान (३१) हे एकाच षटकात माघारी परतल्याने अफगाणिस्तानचा पराभव अटळ ठरला. केवळ औपचारिक राहिलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर २८८ धावांवर बाद होत या विश्वचषकात शेवटपर्यंत विजयापासून वंचित राहिला. वेस्ट इंडिजने सामना २३ धावांनी जिंकत ख्रिस गेलला गोड निरोप दिला.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज: ३११/६ (५०) – शाई होप ७७(९२), निकोलस पुरण ५८(७३), दवलत झरदान ९-१-७३-२
अफगाणिस्तान: – इक्राम अलिखील ८६(९३), रहमत शाह ६२(७८), कार्लोस ब्रेथवेट ९-०-६३-४
]]>