मुंबई (आयएसएल): हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीला एफसी गोवा संघाविरुद्ध पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. मुंबई फुटबॉल एरीनावर यजमान संघाचा 0-2 असा पराभव झाला. एदू बेदियाने पूर्वार्धात खाते उघडले, तर उत्तरार्धात स्पेनचा सदाबहार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने पेनल्टी सत्कारणी लावली.
मुंबईला पहिल्या टप्यात गोव्याविरुद्ध 0-5 असे गारद व्हावे लागले होते. त्यानंतर मुंबईने खेळ उंचावला होता, पण गोव्याविरुद्ध त्यांची गाडी पुन्हा घसरली, पण गुणतक्त्यातील त्यांचा दुसरा क्रमांक कायम राहिला. गोव्याने एक क्रमांक आगेकूच करीत तिसरे स्थान गाठले.
गोव्याने 13 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण झाले. याबरोबरच गोव्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला (14 सामने, 23 गुण) मागे टाकले. बेंगळुर एफसी (13 सामने, 30 गुण) आघाडीवर आहे. मुंबईचा दुसरा क्रमांक कायम राहिला. 14 सामन्यांत आठ विजय, तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 27 गुण कायम राहिले.
मुंबईवर सतत दडपण ठेवण्याचे फळ गोव्याला अर्ध्या तासाच्या आत मिळाले. 28व्या मिनिटाला ब्रँडन फर्नांडीसने मध्य क्षेत्रातून आगेकूच करीत फेरॅन कोरोमीनासला नेटसमोर पास दिला. कोरोमीनासने मारलेला फटका मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने थोपविला, पण हा चेंडू थेट बेदियाच्या पायापाशी गेला. बेदियाने मारलेला फटका शुभाशिष बोस याच्या अंगाला लागून नेटमध्ये गेला. बेदिया याचा हा मोसमातील सहावा गोल ठरला.
उत्तरार्धात एकूण 79व्या मिनिटाला गोव्याच्या ब्रँडन फर्नांडीसने ह्युगो बौमौस याच्या दिशेने चेंडू मारला. त्याने चाल पुढे कायम ठेवत कोरोमीनासच्या दिशेने पास दिला. चेंडू त्याच्यापाशी जाऊन तो फटका मारण्यास सज्ज असतानाच त्याला पाडले. पंच आर. वेंकटेश यांनी शुभाशिषला यलो कार्ड दाखवित गोव्याला पेनल्टी बहाल केली. ती कोरोमीनासने घेतली आणि सत्कारणी लावली. कोरोमीनासने पेनल्टी स्पॉटपासून फार मागून धावत न येता फटका मारला. मैदानालगत नेटच्या डाव्या कोपऱ्यात आलेल्या चेंडूवर अमरिंदर चकला.
गोव्याने नेहमीच्या जोशपूर्ण शैलीत खेळ सुरु केला. सेरीटन फर्नांडीसने उजवीकडून थ्रो-इनवर कोरोमीनासच्या दिशेने चेंडू फेकला. कोरोमीनासने ब्रँडनच्या दिशेने मैदानालगत पास दिला, पण ब्रँडनने मुंबईला चकविण्याच्या उद्देशाने चेंडू त्याच्या मागे असलेल्या मंदार राव देसाई याच्याकडे जाऊ दिला. तेव्हा मंदारला बरीच मोकळीक होती. त्याने ताकदवान फटका मारला, पण अमरींदरच्या बोटांना लागून चेंडू बाजूला गेला.
दहाव्या मिनिटाला अहमद जाहौह याने मध्य रेषेपासून दिलेला पास बेदिया याच्या दिशेने गेला. बेदियाने कोरोमीनास याच्यासाठी संधी निर्माण केली. कोरोमीनासने बॉक्सबाहेरून मारलेला चेंडू थेट अमरींदरकडे गेला. अमरींदरने दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडविला.
सेरीटॉन आणि मुंबईचा रॅफेल बॅस्तोस यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यात सेरीटॉनने बॅस्तोसला ढोपर मारले. त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले.
मुंबईला 17व्या मिनिटाला फ्री-किक मिळाली. मध्य रेषेमागे अन्वर अली याने चेंडू लांब मारला, जो डावीकडे शुभाशिष याच्यापाशी गेला. शुभाशिषला मात्र फिनिशिंग करता येईल किंवा पास देता येईल अशा स्थितीत एकही सहकारी नव्हता.
पुढच्याच मिनिटाला मुंबईच्या मिलन सिंग याने धसमुसळा खेळ केला. त्यात त्याचा बूट बेदियाच्या छातीपाशी लागला. त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले.
मुंबईला 21व्या मिनिटाला आणखी एक संधी मिळाली. मॅटीयस मिराबाजेने कॉर्नरवर पाऊलो मॅचादो याला पास दिला. मॅचादोच्या फटक्यावर रेनीयर फर्नांडीसला हेडींगची उत्
तम संधी होती, पण तो अचूकता साधू शकला नाही. उत्तरार्धात मुंबईच्या ल्युचीएन गोऐन याचा प्रयत्न हुकला.
]]>