कोची, दिनांक 4 डिसेंबर 2016: रोमहर्षक सामन्यात सी. के. विनीत याने उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर केरळा ब्लास्टर्सने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडवर एका गोलने मात केली. सामना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी झाला. केरळा ब्लास्टर्सतर्फे यंदा शानदार खेळ केलेल्या सी. के. विनीत याने 66व्या मिनिटास यजमान संघाला आघाडीवर नेले. त्याचा हा यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक पाचवा गोल ठरला. डाव्या बगलेतून महंमद रफीकडून चेंडू मिळाल्यानंतर विनीतने प्रतिस्पर्धी बचावपटूंना मागे टाकत जोरदार मुसंडी मारली. अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करताना गोलरिंगणाच्या बाहेर ताकदवान फटक्यावर चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. या गोलनंतर स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. उपस्थित 53,767 फुटबॉलप्रेमींपैकी बहुतेक केरळा ब्लास्टर्सचेचे पाठीराखे होते. दोन टप्प्यातील उपांत्य फेरीत आता मुंबई सिटीची गाठ ऍटलेटिको द कोलकता संघाशी, तर केरळा ब्लास्टर्सची गाठ दिल्ली डायनॅमोज संघाशी पडेल. केरळा ब्लास्टर्सचे आजच्या विजयामुळे 14 सामन्यांतून 22 गुण झाले, त्यांना मुंबई सिटी एफसीनंतर दुसरा क्रमांक मिळाला. त्यांचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला. नॉर्थईस्टला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 14 सामन्यानंतर 18 गुण व पाचवा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यात गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचाही आज केरळा ब्लास्टर्सचे वचपा काढला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही, त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. उपांत्य फेरीसाठी नॉर्थईस्टला विजयाची नितांत गरज होती, तर केरळास बरोबरी पुरेशी होती. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात केरळा ब्लास्टर्सच्या डकेन्स नॅझॉन याने जास्त आक्रमक खेळ केला. त्याने वारंवार नॉर्थईस्टच्या बचावफळीवर दबाव टाकला. केरळा ब्लास्टर्सच्या बचावफळीचा नॉर्थईस्टचा हुकमी खेळाडू एमिलियानो अल्फारो याच्यावर दक्ष पहारा होता, त्यामुळे पाहुण्या संघाच्या आक्रमणावर मर्यादा आल्या. नॉर्थईस्टच्या आघाडीफळीने यजमान संघाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा कर्णधार ऍरन ह्यूजेसने एकाग्रता ढळू दिली नाही. नॉर्थईस्टच्या सेईत्यासेन सिंग याने गोलसाठी प्रयत्न केले, परंतु त्याला यश मिळाले नाही. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला नॅझॉनला गोल करण्याची संधी होती, पण प्रतिस्पर्धी गोलरक्षक टी. पी. रेहेनेश दक्ष होता. सामन्याच्या साठाव्या मिनिटास नॉर्थईस्टला आघाडी घेण्याच्या संधी होती, परंतु एमिलियानो अल्फारोचा सणसणीत फटका केरळाचा गोलरक्षक ग्रॅहॅम स्टॅक याने यशस्वी होऊ दिला नाही. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूही एकमेकांना भिडले. रेफरींनी वेळीच मध्यस्थी केली. त्यांनी केरळाचा संदेश झिंगान आणि नॉर्थईस्टचा अल्फारो यांना यलो कार्ड दाखविले. 73व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सला आघाडी फुगविण्याची संधी होती. डकेन्स नॅझॉनने केव्हर्न बेलफोर्ट याला सुरेख पास दिला. त्याने नॉर्थईस्टच्या बचावपटूंना चकवत मारलेल्या ताकदवान फटक्याला गोलरक्षकाने वेळीच रोखले. लगेच दोन मिनिटांनी केरळा संघाला पुन्हा एकदा गोलने हुलकावणी दिली. यावेळी अंतोनिओ जर्मन याचा फटका गोलरक्षक रेहेनेश याने अडविला. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टच्या सेईत्यासेनने ऐनवेळी गडबड केल्यामुळे पाहुण्या संघास बरोबरी साधता आली नाही. शेवटच्या काही मिनिटांत नॉर्थईस्टने यजमानांची आघाडी भेदण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, परंतु त्यांना शेवटपर्यंत यश मिळाले नाही. सामन्याच्या 86व्या मिनिटाला अंतोनिओ जर्मनचा गोल रेफरींनी नाकारला, त्यामुळे केरळाची आघाडी एका गोलपुरतीच मर्यादित राहिली.]]>