बेंगळुरू: चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात विजेतेपद पटकावले. पदार्पणात ही स्पर्धा जिंकण्याचे बेंगळुरू एफसीचे स्वप्न चेन्नईने उध्वस्त केले. चेन्नईने 3-2 असा विजय मिळविला. पुर्वार्धात 2-1 अशी आघाडी घेत चेन्नईने आणलेले दडपण बेंगळुरूला श्री कांतिरवा स्टेडियमवर यशस्वीपणे पेलता आले नाही. भरपाई वेळेत व्हेनेझुएलाच्या मिकूने पिछाडी कमी केली, पण त्यापेक्षा जास्त प्रयत्न बेंगळुरुला घरच्या मैदानावर करता आले नाहीत. मैल्सन आल्वेस चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दोन गोल केले. बेंगळुरूने सुरवात धडाक्यात केली. केवळ नवव्या मिनिटाला त्यांनी खाते उघडले. कर्णधार सुनील छेत्री याने हेडींगवर अप्रतिम गोल केला. मिकूने उदांता सिंगला पास दिला. उदांताने उजवीकडून मुसंडी मारली. त्याने क्रॉस पासवर मारलेला चेंडू चेन्नईच्या मैल्सन आल्वेसच्या पायाला लागला. छेत्री अॅक्शनचा दक्षतेने अंदाज घेतला आणि हेडिंगने लक्ष्य अचूक साधले. चेन्नईने यास जोरदार प्रत्यूत्तर दिले. 17व्या मिनिटाला डावीकडे त्यांना कॉर्नर मिळाला. त्यावर कर्णधार ग्रेगरी नेल्सन याने नेटसमोर उंच चेंडू मारला. मग आल्वेसने उंच उडी घेत ताकदीने हेडिंग केले. चेंडू गोलपोस्टच्या उभ्या दांडीवर धडकून आत गेला तेव्हा बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत हताश झाला. पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात चेन्नईने आघाडी घेत यजमान संघाचे धाबे दणाणून सोडले. यावेळी उजवीकडून मिळालेल्या कॉर्नरचे चेन्नईने सोने केले. नेल्सनने पुन्हा एकदा अफलातून किक मारली. यावेळी आल्वेसने नेटच्या कोपऱ्यात अचूक हेडींग केले. 67व्या मिनिटाला चेन्नईने तिसरा गोल केला. नेल्सननेच ताकदवान मुसंडी मारत ही चाल रचली. त्याने जेजे लालपेखलुआ याला पास दिला. जेजे चेंडूवर ताबा मिळविताना थोडा अडखळला, पण त्याने वेळीच तोल सावरत आगुस्टोला बॉक्सजवळ पास दिला. डावीकडून आगुस्टोने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारला. बेंगळुरूने उत्तरार्धाच्या प्रारंभी काही संधी दवडल्या. त्यात 60व्या मिनिटाला उदांताच्या पासवर जॉन जॉन्सन याला फटका चुकला. 72व्या मिनिटाला फ्री-किकवर छेत्रीला संधी साधता आली नाही. निकाल: बेंगळुरू एफसी: 2 (सुनील छेत्री 9, मिकू 90-2) पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी: 3 (मैल्सन आल्वेस 17, 45, रॅफेल आगुस्टो 67 )]]>