मुंबईचा हैद्राबादवर 'सुपर' विजय, प्लेऑफचा प्रवेश निश्चित

मुंबई:  शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज. हार्दिक पंड्यांचा सामना करण्यास उभा होता तो मनीष पांडे. पांडेने मिड-विकेटला षटकार ठोकत मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिलावहिला सुपर ओव्हर सामना रंगवला. अतिशय नाट्यमय रंगलेल्या या सामन्यात जसप्रीत बुमरा व हार्दिक पंड्या यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकत इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या सत्रात प्लेऑफ मध्ये धडक मारली.

नाणेफेक जिंकत यजमान मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. तिकडे सनरायजर्स हैद्राबाद डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरीस्टो यांच्या अनुपस्थितीत उतरला. रोहितने डीकॉकच्या साथीने डावाची सुरुवात करीत दुसऱ्याच षटकात खलील अहमदला तीन चौकारांसह १३ धावा ठोकत चांगल्या सुरुवातीचे संकेत दिले. पण पावरप्लेच्या शेवटच्या षटकात खलीलने रोहितला (२४ धावा १८ चेंडू) चकमा देत तंबूत धाडले. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईने सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. सूर्याने डीकॉकसह दुसऱ्या गड्यासाठी ३८ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी करीत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला.

हैद्राबादच्या गोलंदाजांनी आज काहीशी वेगळीच रणनीती आखली होती. पहिल्या पाच षटकांत त्यांनी तब्बल चार गोलंदाज काढीत मुंबईच्या फलंदाजांवर दबाव आणला. आणि याचाच फायदा त्यांना मधल्या षटकांत झाला. मुंबईसाठी डीकॉकचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. डीकॉकने ५८ चेंडूंत संयमी नाबाद ६९ धावा जमवल्या. यात सहा चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. यादव (२३), इवीन लुईस (१), हार्दिक पंड्या (१८), पोलार्ड (१०) हे मधल्या फळीतील फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ तग न धरू शकल्याने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्धारित २० षटकांत केवळ १६२ धावांवर समाधान मानावे लागले. भुवनेश्वर कुमार (४-०-२९-१), खलील अहमद (४-०-४२-३), मोहम्मद नबी (४-०-२४-१) व रशीद खान (४-०-२१-०) यांच्या माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले.

१६३ धावांचं आव्हान पेलण्यास उतरलेल्या सनरायजर्स हैद्राबादने सुरुवात दणक्यात केली. वृद्धिमान सहा व मार्टिन गप्टिल यांनी पहिल्या गड्यासाठी चार षटकांत ४० धावांची सलामी देत पाहुण्यांना चांगलेच खुश केले. सहा (२५) बाद झाल्यानंतर काही अंतरावरच गप्टिलला (१५) बाद करण्यात बुमराला यश आलं. कृणाल पंड्याने हैद्राबादचा कर्णधार केन विल्यम्सनला (३) बाद करीत पाहुण्यांची अवस्था तीन बाद ६५ अशी केली. कृणालने लगेच विजय शंकरला १२ धावांवर पोलार्डकरवी झेलबाद करीत मुंबईला सामन्यात आणले. हार्दिक पंड्याने युवा अभिषेक शर्माला केवळ दोन धावांवर माघारी धाडत हैद्राबादचा निम्मा संघ तंबूत परतवला.

हैद्राबादला शेवटच्या तीन षटकांत जिंकण्यासाठी ४१ धावांची गरज होती. मनीष पांडेने आपले अर्धशतक झळकावत एका बाजूने किल्ला लढवला होता. त्याला मोहम्मद नबीने चांगली साठी दिली होती. शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना या दोन्ही खेळाडूंनी चांगली चतुराई दाखवीत शेवटच्या चेंडूवर सात धावा असे समीकरण आणले. पण हार्दिक पंड्याचा फुलर लेन्थचा चेंडू मनीष पांडेने मिड-विकेट सीमारेषेपलीकडे मारत सामना बरोबरीत आणला.

सुपर ओव्हरमध्ये निर्णय झालेल्या या सामन्यात मुंबईने हैद्राबादला आठ धावांत रोखल्यानंतर नऊ धावांचं लक्ष्य पार पडण्यास उतरलेल्या मुंबईने केवळ तीन चेंडूंतच सामना जिंकला. हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूंवर रशीद खानला षटकार खेचत मुंबईकरांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणलं. या विजयाबरोबर मुंबईने प्लेऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केला.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *