दिल्ली, दिनांक 27 ऑक्टोबर 2016: एफसी पुणे सिटीची दिल्ली डायनॅमोजविरुद्ध सामना न जिंकण्याची परंपरा गुरुवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर कायम राहिली. हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील या दोन्ही संघांतील सामना 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. गोलरक्षक इदेल बेटे याच्या पूर्वार्धातील अप्रतिम गोलरक्षणानंतरही पुणे सिटीला हा सामना जिंकता आला नाही. त्यांना पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये स्पॅनिश जेझूस रॉड्रिगेझ टाटो याने आघाडीवर नेले होते, नंतर 79व्या मिनिटाला मिलन सिंग याने दिल्ली डायनॅमोजला बरोबरी साधून दिली. पुणे सिटीविरुद्धच्या आतापर्यंतच्या पाच लढतीत दिल्ली डायनॅमोज संघ अपराजित आहे. त्यांनी तीन विजय नोंदविले आहेत, तर दोन सामने बरोबरीत राहिलेले आहेत. दिल्ली डायनॅमोज आणि पुणे सिटीला प्रत्येकी एक गुण मिळाला. दिल्लीची ही स्पर्धेतील चौथी बरोबरी होती. त्यांचे सहा सामन्यांतून सात गुण झाले आहेत. पुणे सिटीची ही तिसरी बरोबरी असून त्यांचे सहा लढतीनंतर सहा गुण झाले आहेत. आजच्या निकालानंतर दिल्लीचे सहावे, तर पुणे सिटीचे सातवे स्थान कायम राहिले आहे. मेहनती युवा स्ट्रायकर मिलन सिंग याने अखेरीस उत्तरार्धात पुणे सिटीचा गोलरक्षक इदेल बेटे याचा बचाव भेदला. त्यामुळे दिल्लीला बरोबरी साधता आली. मार्सेलो लैते परेरा याच्या फ्रीकिक फटक्यावर मिलनने चेंडू नियंत्रित केला. नंतर त्याने गोलरिंगणातून मारलेल्या फटक्यावर चेंडूने जोनाथन लुका याच्या पायामधून चेंडूने बेटे झेपावण्यापूर्वीच गोलजाळीचा वेध घेतला. मिलनचा हा यंदाच्या पहिलाच गोल ठरला. पुणे सिटीने पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममधील दुसऱ्या मिनिटास आघाडी घेतली. स्पॅनिश खेळाडू जेझूस रॉड्रिगेझ टाटो याने नोंदविलेल्या शानदार गोलमुळे पाहुण्या संघास आघाडी मिळाली. राहुल भेके याच्या “असिस्ट’वर जेझूसने हेडरने लक्ष्य साधले. यावेळी राहुलने त्याला चांगला क्रॉस पास दिला होता. दिल्ली डायनॅमोजने पूर्वार्धातील खेळात पुणे सिटीच्या बचावफळीस चांगलेच जेरीस आणले होते, परंतु गोलरक्षक इदेल बेटे याचा बचाव भेदणे यजमानांना जमले नाही. गतवर्षी स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ठरलेल्या बेटे याने वेळोवेळी प्रतिस्पर्ध्यांची आक्रमणे फोल ठरविली. बेटे याने 12व्या मिनिटाला मिलन सिंगचा प्रयत्न अडविला, नंतर 20व्या मिनिटाला सौविक चक्रवर्तीचा प्रयत्नही यशस्वी होऊ दिला नाही. 22व्या मिनिटाला रिचर्ड गादझे याचा फटका अडविताना बेटे याने सर्वोत्तम कामगिरी प्रदर्शित केली. गादझे याचा हेडर गोलरक्षकाने वेळीच रोखला. त्यानंतर अनुक्रमे 31 व 36व्या मिनिटाला गादझे याचे फटके रोखून बेटे त्याला भारी ठरला. विश्रांतीला एक मिनिट बाकी असताना बेटे याने दिल्लीची फ्रिकिकही फोल ठरविली. सामन्याच्या 53व्या मिनिटाला दिल्लीला बेटे याचा बचाव भेदण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती. बेटे आणि पुणे सिटीचा नारायण दास यांच्यातील सामंजस्याच्या अभावाचा लाभ दिल्लीला उठविता आला नाही. बेटे याने आपली जागा सोडली होती, परंतु समोर गोलजाळी खुणावत असताना दिल्लीच्या मार्सेलो लैते परेरा याने घाईगडबडीत दिशाहीन फटका मारला. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना गादझे याचा फटका अगदी थोडक्यात हुकला, त्यामुळे गोलबरोबरी कायम राहिली. शेवटच्या काही मिनिटांत दिल्लीने विजयी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. सौविक चक्रवर्तीचा हेडर पुणे सिटीचा बचावपटू गौरमांगी सिंग याने उधळून लावला, तर रुबेन रोचा याचा हेडर धर्मराज रावणनन याने रोखला. शेवटच्या मिनिटास कॉर्नर किकवर राहुल भेके याचा हेडर थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षकाकडे गेल्यामुळे पुणे सिटीची शेवटची संधीही हुकली]]>