एका कसलेल्या खेळाडूला देश-विदेशात चांगली कामगिरी करूनही संघातून बाहेर राहावं लागणं यापेक्षा मोठं दुःख काय असू असू शकतं. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातून तब्बल १२ वर्षानंतर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या देविंदर वाल्मिकी याच्याशी आमचे प्रतिनिधी भास्कर गाणेकर यांनी केलेली ही खास बातचीत.
“उम्मीद पर दुनिया कायम हैं कहते हैं सभी, मंज़िल ज़रूर मिलेगी बरखुरदार कभी न कभी…” आपण प्रत्येकाने आयुष्यात हा ‘डायलॉग’ स्वतःवर एकदा ना एकदा मारला असेलच. मग ते शिक्षणाच्या वेळेस असतो, नोकरीसाठी असो वा प्रेमात असो. असो. पण एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जो दिवसरात्र मेहनत करून आपला सर्वोत्तम खेळ दाखवतो, देशात-परदेशात आपल्या खेळीने सर्वांची माने जिंकतो. पण कोणतेही कारण नसताना राष्ट्रीय संघातून डच्चू मिळतो? मला तर मोठा यक्ष प्रश्न पडतो कि ‘उम्मीद’ नक्की ठेवायची ती काय? भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राकडून तब्बल १२ वर्षानंतर प्रतिनिधित्व करणाऱ्या देविंदर वाल्मिकेने डिसेंबर २०१६ ला भारतीय जर्सीत जो शेवटचा सामना खेळाला तो आजवर शेवटचाच सामना ठरलाय. हॉकी इंडियाने मार्च २०१७ मध्ये ज्या ४८ खेळाडूंची कॅम्पसाठी घोषणा केली त्यात देविंदरला वगळण्यात आलं आणि त्याच्यासह त्याच्या घरच्यांना व सहकाऱ्यांना धक्काच बसला. एवढा चांगला खेळ करूनही अशी वागणूक मिळते म्हणजे काय? निदान कॅम्पसाठी निवड अपेक्षित होती तीही नाही.
एक जमाना होता भारतीय हॉकीचा. आजही म्हणा या राष्ट्रीय खेळाला लोक प्रेम करतात. पण खेळाडूंची जी उपेक्षा होते कि खरंच चिंताजनक आहे. मग त्यांना मिळणारं वेतन, सरकारी सुविधा, एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून समाजात स्थान, नक्कीच क्रिकेट व कबड्डीपेक्षा कमीच आहे. अगदी खूपच कमी. भारतात एका प्रथम श्रेणी क्रिकेटरला जो पगार मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी सामन्याची फी राष्ट्रीय खेळाडूला मिळते. हॉकीची अशी परिस्थिती असतानाही देविंदर वाल्मिकी या तरुणाने हॉकी या खेळात आपलं करियर करण्याचा निर्णय घेतला. भाऊ युवराज वाल्मिकी ज्याने भारताला बऱ्याच स्पर्धांत विजयश्री खेचून दिले होते त्याच्या पावलावर पाऊल ठेवत देविंदरने आपल्या विशेष शैलीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने भारतासाठी प्रतिनिधित्व करीत मुंबईसह महाराष्ट्राचे नाव उंच केले. बरं, त्याचा खेळ इथेच थांबला नाही. देशांतर्गत स्पर्धांतही वाहवाह मिळवत आपला खेळ आणखी बहराला. मग इतके असतानाही आज त्याला राष्ट्रीय संघात स्थान का नाही? परफॉर्मन्स? नाही! फिटनेस? अजिबात नाही!! गैरवर्तन? शक्यच नाही!!! मग काय गुन्हा केलाय कि त्याला जवळजवळ दोन वर्षे कामगिरीत सातत्य असूनही संघात, कॅम्पमध्ये स्थान नाही? याचं उत्तर कदाचित परमेश्वरच देईल.
ऑलिम्पिक २०१६ पूर्वी मी त्याची पहिल्यांदा मुलाखत घेतली होती. मला चांगलं आठवतंय. त्यावेळेस २४ वर्षाच्या देविंदरच्या आवाजात देशासाठी खेळण्याची हुरहूर, एक चमक, उत्सुकता, जोश जाणवत होता. भाऊ युवराज ज्याने २०१४ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्याला तोही देविंदरच्या ऑलिम्पिक वारीने जाम खुश होता. मुंबईच्या मरीन लाईन्स येथील झोपडपट्टीत १६ बाय १६ च्या घरात जन्मलेल्या वाल्मिकी कुटुंबातून आजपर्यंत तब्बल तीन खेळाडू भारतासाठी दिलेत. छोटा भाऊ अनुपही भारतासाठी हॉकी खेळलाय.
कामगिरीत सातत्य
डिसेंबर २०१६ नंतर देविंदर राष्ट्रीय संघातून बाहेर झाला. त्यानंतर झालेल्या बऱ्याच स्पर्धांत त्याने घवघवीत यश मिळवलं. २०१७ च्या हॉकी इंडिया लीगमध्ये कलिंगा लान्सर्स या संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करीत संघाला पाहिलं जेतेपद मिळवून दिलं. उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश विझार्ड विरुद्ध सामन्यात गोल लगावत सामना जिंकण्यास मोलाची मदत केली. २०१६ साली डिसेंबर मध्ये खेळल्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
संघात स्थान न मिळाल्यामुळे भाऊ युवराजच्या सांगण्यावरून देविंदरने जमर्नीयेथील प्रतिष्ठित बुंदेसलिगा या हॉकी स्पर्धेत ग्रॉस फ्लोटबेकर या संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. २०१७ च्या लीगमध्ये अफलातून कामगिरी करीत देविंदरने साऱ्यांची माने जिंकली. त्याला याच महिन्याअखेरीस होणाऱ्या स्पर्धेचं आमंत्रण मिळालं आहे आणि लवकरच तो जर्मनीसाठी रवाना होणार आहे. शिवाय मागच्या महिन्यात टोरॅन्टो, कॅनडा येथे झालेल्या लायन कप २०१८ मध्ये युनायटेड ब्रदर्स संघाकडून खेळताना जेतेपद मिळवत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताबही फटकावला. हफ्त्यानंतर कॅनडा कप २०१८ मध्ये युबा ब्रदर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना आणखी एक जेतेपद मिळवत इथेही सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. आणखी एका आठवड्याने कॅलिफोर्निया येथे झालेल्या सिख स्पोर्ट्स असोसिएशन स्पर्धेत युबा ब्रदर्सकडून खेळताना आणखी एका जेतेपदाला गवसणी घालत हॅट्ट्रिक साधत येथेही सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिरपेच आपल्या तोऱ्यात रोवला. भारतीय स्पर्धांचा विचार केला तर २०१७ मध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाकडून खेळताना उपविजेत्या पदाची कमाई केली. पंजाब पोलीसविरुद्ध अंतिम सामन्यात त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता.
सरकार, असोशिएशनकडून निराशाच
राजकरण्यांकडून पोकळ आश्वासने देणे हे काही भारतीय जनतेला नवीन नाही. २०११ साली असेच एक आश्वासन तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते युवराज वाल्मिकी याला. पाकिस्तानविरुद्धच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील गोलच्या जोरावर त्याने भारताला जेतेपद मिळवून दिले होते. आणि याच कामगिरीच्या जोरावर चव्हाण साहेबांनी त्याला सरकारी नोकरी व घर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. २०१४ साली महाराष्ट्रात सत्तापालट झाला आणि भाजप सरकार सत्तेत आलं. वानखेडे मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ‘त्या’ आश्वासनचं पुनरावृच्चन केलं पण आज २०१८ संपायला आला तरी आश्वासन अजूनही ‘आश्वासनच’ राहील आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातला एक सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिव छत्रपति पुरस्काराने दोन्ही भावाना सन्मानित करीत कीव आणली पण घराचं आश्वासन आजही पूर्ण केलं नाही. आजही वाल्मिकी कुटुंब त्या १६ बाय १६ च्या झोपडपट्टीत राहतात.
देविंदर ज्या मुंबई हॉकी असोसिएशन कडून जिल्हा स्तरावर खेळतो त्या संघटनेने त्याला नेहमीच मदद केली आहे. परंतु महाराष्ट्र हॉकी असोसिएशनने जेवढी दखल या ऑलिम्पिक स्टारची घ्यायला हवी होती तितकी घेतली नाही. प्रत्येक राज्याचे हॉकी असोसिएशनचे सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत असतात. जेव्हा कॅम्पसाठी खेळाडूंची निवड केली जाते तेव्हा राज्य हॉकी असोसिएशन खेळाडूंची नावे देते. पण कामगिरी झकास असूनही महाराष्ट्र हॉकी असोसिएशनने देविंदरसारख्या खेळाडूवर नेहमीच अन्याय केला. संघ निवड हि कॅम्पमधून होते पंरंतु कॅम्पमधेही निवड न करता देविंदरला एकप्रकारे केराची टोपलीच महाराष्ट्र हॉकी असोसिएशनने दाखवली. जर्मनी, अमेरिका, कॅनडा सारख्या मोठमोठ्या देशांत क्लब हॉकीसाठी जिथे पहिली पसंती म्हणून देविंदरकडे पहिले जाते तिथे स्वतःच्या राज्यातून मात्र निराशाच पदरात पडते.
आई, भाऊ आधारस्तंभ
साहजिकच आहे, जर तुम्ही चांगला खेळ करूनही जर संघात स्थान मिळत नसेल तर नैराश्य येणारच. पण कोणालाही दोष न देता देविंदर आजही ‘उम्मीद’ कायम ठेऊन आहे. त्याचा रोजचा व्यायाम हा ठरलेला असतो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो सतत घाम गाळताना दिसतो. कदाचित माझ्या खेळातच कुठेतरी कमतरता असेल हाच विचार करून दिवसरात्र तो मेहनत करून संघात परतण्यास धडपड करतोय. आणि त्याला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचं काम करतात ते त्याचा मोठा भाऊ युवराज व आई. अगदी लहानपणापासून मोठ्या भावाचं बोट पकडून खेळायला सुरुवात केलेल्या देविंदरला आजही युवराजचा मोठा सहारा आहे.
आशा आहे कि महाराष्ट्र हॉकी असोसिएशन देविंदरच्या मागील १५-१८ महिन्याच्या कामगिरीची व मेहनतीची दाखल घेईल आणि राष्ट्रीय संघात सपुन्हा स्थान मिळवण्यास शिफारस करेल. देविंदर आजही या ‘उम्मीद’ वर आहे आणि आणखी मेहनत करण्यास सज्ज आहे.
]]>