ऍडलेड: दुबळ्या ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवून ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी मालिका जिंकण्याची नामी सुवर्णसंधी या मालिकेद्वारे भारताला होती. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात नवख्या खेळाडूंचा भरणा असल्यामुळे मालिका सुरु होण्याच्या अगोदरच भारत फेव्हरेट मानला जात होता. त्याच अनुषंगाने भारतीय दलाने आपली कामगिरी चोख बजावत ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी ३१ धावांनी पराभूत करीत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याची किमया तब्बल १० वर्षांनी केली. २००८ साली महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने रिकी पॉंटिंगच्या संघाला पार्थ येथे शेवटचे पराभूत केले होते. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरेल ते चेतेश्वर पुजार व गोलंदाज.
३२३ धावांचं लक्ष घेऊन मैदान उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था चौथ्या दिवसाअखेरीस चार बाद १०४ अशी झाली होती. पाचव्या व शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी केवळ २१९ धावा होत्या. तर भारताला सहा गडी. सामना कोणाच्याही पारड्यात जाऊ शकत होता. ऑस्ट्रेलियाला घराच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होता तर भारताकडे तगडी गोलंदाजी.
शॉन मार्श व हेड सेट झालेले दिसत होते. तर भारतीय तंबूत काहीसे चिंतेचे वातावरण दिसत होते. भारताला विकेट्स पाहिजे होते आणि ऑस्ट्रेलियाला धावा. त्यानंतर शॉन मार्श आणि टीम पेन यांनी सहाव्या विकेटसाठी ४२धावांची भागीदारी केली. भारतासाठी हि जोडी डोकेदुखी वाटत होती. दरम्यान, बुमराने शॉन मार्शची (६०) विकेट काढत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर खेळपट्टीवर चिवट खेळी करणाऱ्या टीम पेनलाही (४१) माघारी धाडत बुमराने भारताला विजयाच्या आणखी जवळ आणले. मात्र कांगारूंच्या शेपटाने पुन्हा चिवट खेळ करीत भारताचा विजय काहीसा लांबवला. १२१ चेंडूत २८ धावांची चिकाटी खेळी करणाऱ्या पॅट कमिन्सने मिचेल स्टार्कच्या साथीने आठव्या गड्यासाठी ४१ आणि नाथन लायनच्या साथीनेनवव्या गड्यासाठी ३१ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशाचा पल्लवित केल्या. अखेरीस बुमरानेच कमिन्सचा अडथळा दूर करीत भारताला विजयाच्या जवळ आणलं.
शेवटच्या गड्यासाठीही लायन व हेझलवूड यांनी ३२ धावांचं योगदान दिल्यानं ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुन्हा एकदा जिवंत केलं. परंतु अश्विनने आपल्या फिरकीने हेझलवूडचा अडथळा दूर करीत भारताला विजयश्री आणलं.
]]>