गुवाहाटी, दिनांक 28 ऑक्टोबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या ऍटलेटिको द कोलकता संघाने पिछाडीवरून जबरदस्त विजय नोंदवून गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविले. नॉर्थईस्ट युनायटेडला त्यांनी शुक्रवारी 2-1 असे हरविले. सामना येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर झाला. गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविण्याच्या उद्देशाने कोलकत्यास आज विजय आवश्यक होता, तर नॉर्थईस्टला बरोबरीही पुरेशी ठरली असती. पूर्वार्धातील 39व्या मिनिटाला उरुग्वेच्या एमिलियानो अल्फारो याने गोल केल्यामुळे यजमान संघाला एका गोलची आघाडी मिळाली होती. विश्रांतीनंतर 63व्या मिनिटाला “सुपर सब’ पोर्तुगीज खेळाडू हेल्डर पोस्तिगा याने कोलकत्यास बरोबरी साधून दिली, तर 82व्या मिनिटाला स्पॅनिश आघाडीपटू ज्युआन बेलेन्कोसो याने माजी विजेत्यांना आघाडी मिळवून दिली. ऍटलेटिको द कोलकताचा हा यंदाच्या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यांचे सात सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. पहिला क्रमांक मिळविताना त्यांनी मुंबई सिटीवर एका गुणाची आघाडी घेतली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे नॉर्थईस्ट युनायटेड संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्यांचे सात सामन्यांतून 10 गुण कायम राहिले आहेत. सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये नॉर्थईस्टने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. रीगन सिंगचा प्रयत्न गोलरेषेजवळून बोर्जा फर्नांडेझने उधळून लावला, त्यामुळे कोलकत्याचा विजय पक्का झाला. “सुपर सब’ हेल्डर पोस्तिगा याच्या अप्रतिम हेडरमुळे माजी विजेत्यांनी 63व्या मिनिटाला बरोबरी साधली. रॉबर्ट लाल्थालामुआना याने तोलूनमापून दिलेल्या क्रॉस पासवर पोस्तिगाच्या हेडरने गोलरक्षक सुब्रत पॉलचा बचाव भेदत गोलजाळीचा वेध घेतला. पोर्तुगीज खेळाडूचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला. दुखापतीमुळे नॉर्थईस्टचा नियमित गोलरक्षक सुब्रत पॉलने मैदान सोडल्यानंतर कोलकत्याने 2-1 अशी आघाडी घेतली. सामन्याची शेवटची आठ मिनिटे बाकी असताना ज्युआन बेलेन्कोसो याने माजी विजेत्यांचे पारडे जड केले. लालरिनडिका राल्टे याने याने पुरविलेल्या चेंडूवर ज्युआन याने “अनमार्क’ असल्याची संधी साधत चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. उरुग्वेच्या एमिलियानो अल्फारो याने याने 39व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडचे खाते खोलत यंदाच्या स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदविला. निर्मल छेत्रीच्या सुंदर क्रॉस पासवर अल्फारोच्या हेडरने कोलकत्याचा गोलरक्षक देबजित मजुमदार याचा अंदाज चुकविला. पूर्वार्धातील खेळ रंगतदार आणि आक्रमक ठरला. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात तिघा खेळाडूंना यलो कार्ड मिळाले. यामध्ये कोलकत्याचा बोर्जा फर्नांडेझ व स्टीफन पियरसन यांचा, तर नॉर्थईस्टच्या एमिलियानो अल्फारो यांचा समावेश होता. उत्तरार्धाच्या सुरवातीस कोलकत्याने संघात बदल करताना सामीग दौती याच्या जागी पोस्तिगाला मैदानात पाठविले. हा निर्णय “मास्टर स्ट्रोक’ ठरला. पोर्तुगीज खेळाडूच्या समावेशाने कोलकत्याचा खेळ आणखीनच धारदार झाला. मैदानावर उतरल्यानंतर पाचच मिनिटांनी त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या रिंगणात पहिली चढाई केली. सामन्याच्या 78व्या मिनिटास सुब्रत पॉलला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्याची जागा बदली गोलरक्षक वेलिंग्टन गोम्स याने घेतली. त्यापूर्वी 72व्या मिनिटाला पॉलच्या चुकीमुळे कोलकत्यास आघाडीचा गोल नोंदविता आला असता, परंतु हेन्रिक सेरेनो याच्यासमोर मोकळी संधी असताना त्याने दिशाहीन फटका मारला. मात्र नंतर नियमित गोलरक्षक नसल्याची किंमत नॉर्थईस्टला मोजावी लागली. कर्णधार बोर्जा फर्नांडेझच्या गोलमुळे कोलकत्यास आघाडी मिळाली. कोलकत्याने आघाडी घेतल्यानंतर दोनच मिनिटानंतर नॉर्थईस्टच्या कात्सुमी युसा याला बरोबरीचा गोल करण्याची सुरेख संधी होती, परंतु जपानी खेळाडू चेंडूला योग्य दिशा दाखवू शकला नाही.]]>