कोलकता, दिनांक 29 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत अॅटलेटिको द कोलकता आणि केरळा ब्लास्टर्सने गोलबरोबरीवर समाधान मानले. सामना मंगळवारी येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर झाला. अपेक्षित निकालामुळे कोलकत्यास दिल्ली डायनॅमोजसह उपांत्य फेरीतील जागा पक्की करणे शक्य झाले. मुंबई सिटीने अगोदरच उपांत्य फेरी गाठली आहे. मुंबईचे 22, तर दिल्लीचे 20 गुण झाले आहेत. कोलकताचे 19 गुण झाले असून त्यांची गोलसरासरी केरळापेक्षा सरस आहे. आजच्या बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे त्यांच्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकात फरक पडला नाही. प्रत्येकी 13 सामने खेळल्यानंतर कोलकता व केरळाचे प्रत्येकी 19 गुण झाले. सी. के. विनीत याने आठव्याच मिनिटाला केरळा ब्लास्टर्सचे खाते खोलले. त्यानंतर 18व्या मिनिटास स्टीफन पियरसनने कोलकतास बरोबरी साधून दिली. उत्तरार्धातील खेळात दोन्ही संघांनी विशेष धोका पत्करला नाही. त्यामुळे पूर्वार्धाप्रमाणे जास्त चुरस दिसली नाही. कोलकत्याचा हा सातवा, केरळाचा चौथा बरोबरीचा सामना आहे. कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या चुकीमुळे केरळास आघाडी घेणे सोपे ठरले. मेहताब हुसेनचा क्रॉसपास अडविण्यासाठी गोलरक्षक मजुमदारने आपली जागा सोडली. या प्रयत्नात त्याचा गोंधळ उडाला. त्याचवेळी चेंडूवर विनीतने ताबा मिळविला आणि हेडरने गोलजाळीची दिशा दाखविली. यावेळी कोलकताचे प्रशिक्षक होजे मॉलिना यांनाही निराशा लपविता आली नाही. विनीतचा हा स्पर्धेतील चौथा गोल ठरला. कोलकताने दहा मिनिटांनी मुसंडी मारत बरोबरी साधली. इयान ह्यूमने सुरवातीची चाल रचली. त्याने हेल्दर पोस्तिगाला चेंडू पुरविला. त्यानंतर पोर्तुगीज खेळाडूने पियरसनकडे चेंडू पास केला. त्याने वेळ न दवडता चेंडूला गोलजाळीत मारताना केरळाच्या गोलरक्षकाला सहजपणे चकविले. बरोबरीच्या गोलनंतर कोलकताचा आत्मविश्वास उंचावला. त्यांनी केरळा ब्लास्टर्सचे आक्रमक नुकसान करणार नाहीत याची दक्षता घेत विश्रांतीपर्यंत बरोबरी टिकवून ठेवली. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना कोलकताची आघाडी घेण्याची चांगली संधी वाया गेली. पोस्तिगाने केरळाच्या रिंगणात आक्रमक चाल केली. त्याने हावियर लारा याला चेंडू पुरविला. त्याला फटका क्रॉसबारला आपटल्यानंतर रिबाऊंडवर पोस्तिगाचा हेडर अचूक दिशा राखू शकला नाही. कोलकताने बरोबरी साधल्यानंतर केरळासही कोंडी फोडणे शक्य होते, परंतु केर्व्हन्स बेलफोर्टने कोलकत्याच्या बचावपटूंना चकवा दिल्यानंतर 27व्या मिनिटाला गोलरक्षक मजुमदारने फटक्याचा अचूक अंदाज बांधत चेंडू अडविला. सामन्याच्या 77व्या मिनिटाला प्रीतम कोटलच्या दक्षतेमुळे कोलकता संघ बचावला. केरळाच्या महंमद रफीने डाव्या पायाने ताकदवान फटका मारला होता, प्रीतमने वेळीच धाव घेत चेंडू गोलजाळीचा वेध घेणार नाही याची दक्षता घेतली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटास कोलकताचे प्रशिक्षक मॉलिना यांनी हावियर लारा ग्रान्डे याला विश्रांती देत सामीग दौती याला मैदानात पाठविले, पण त्याचा विशेष लाभ झाला नाही. गोलबरोबरीची कोंडी कायमच राहिली. त्यापूर्वी 80व्या मिनिटाला कोलकताने आणखी एक बदल करताना इयान ह्यूमच्या जागी जुआन बेलेन्कोसो याला मैदानात धाडले होते.]]>
Related Posts

अभिषेकच्या झंझावातापुढे इंग्लंड हतबल, मालिका ४-१ ने जिंकली
In this final T20I of the series against England at Wankhede, Abhishek Sharma’s hundred and two wickets rattled England.