कोलकता, दिनांक 17 नोव्हेंबर 2016: सामन्याच्या अंतिम टप्प्यात इयान ह्यूमने नोंदविलेल्या गोलमुळे हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या ऍटलेटिको द कोलकतास गुरुवारी पराभव टाळता आला. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर सामना झाला. सामन्याच्या पाचव्या मिनिटास निकोलस वेलेझ याने नोंदविलेल्या अप्रतिम गोलच्या बळावर नॉर्थईस्ट संघ नव्वदाव्या मिनिटापर्यंत आघाडीवर होता, मात्र ह्यूमने गोलरक्षक सुब्रत पॉलचा बचाव भेदला. त्यामुळे यजमान संघाला एक गुण मिळविता आला. ह्यूमचा हा यंदाच्या स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. हावियर लारा ग्रान्डेच्या फ्रीकिकवर चेंडू खोलवर आला. यावेळी हेल्दर पोस्तिगाने हेडरद्वारे गोलरिंगणात चेंडू पाठविला. त्याचवेळी ह्यूमने संधी साधली. सामन्यातून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे कोलकताचे दहा सामन्यांतून 14 गुण, तर तेवढेच सामने खेळलेल्या नॉर्थईस्टचे 11 गुण झाले. सलग चार पराभवानंतर नॉर्थईस्ट युनायटेडला आज पहिला गुण मिळाला. कोलकत्याचे चौथे स्थान कायम राहिले आहे, तर नॉर्थईस्ट युनायटेडने सातवा क्रमांक मिळविताना एफसी गोवाला खाली ढकलले. सहा लढतीत चार पराभव व दोन बरोबरी यामुळे नॉर्थईस्ट युनायटेड संघ पुन्हा एकदा विजयापासून दूर राहिला. सामन्याच्या 82व्या मिनिटाला एमिलियानो अल्फारो याने लक्ष्य साधले असते, तर नॉर्थईस्टला कदाचित हा सामना जिंकता आला असता. मागील पाच सामन्यांत विजय मिळवू न शकलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडने सुरवातीसच कोलकतास धक्का दिला. निकोलस वेलेझ याने अप्रतिम कौशल्याच्या बळावर पाहुण्या संघाला पाचव्याच मिनिटाला आघाडीवर नेले. हा गोल नोंदविताना वेलेझने चेंडूवर नियंत्रणाचे सुरेख कसब प्रदर्शित केले. कोलकताच्या हेन्रिक सेरेनो याने आपला सहकारी अरनाब मंडल याला चेंडू पास करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू वेलेझच्या ताब्यात गेला. त्याने मंडलला गुंगारा दिला. नंतर चेंडूवर नियंत्रण राखत गोलरक्षक देबजित मजुमदारला गुंगारा देत शानदार फटक्यावर नॉर्थईस्टला आघाडी मिळवून दिली. बचावपटू सेरेनोची चूक कोलकतासाठी चांगलीच महागात पडली. एका गोलच्या पिछाडीनंतर कोलकताने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न ेकेले, पण नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉलचा बचाव यजमान संघासाठी भक्कम ठरला. सामन्याच्या 36व्या मिनिटाला कोलकताच्या सेरेनोला अगोदरच्या चुकीची भरपाई करण्याची संधी होती, परंतु सेरेनोचाहेडर अचूक लक्ष्य साधू शकला नाही. नंतर 39व्या मिनिटाला कोलकताने पुन्हा मुसंडी मारली. प्रबीर दासने दिलेल्या पासवर रॉबर्ट लाल्थलामुआना याचा फटका भेदक ठरला नाही, मात्र स्टीफन पियरसन याने चेंडूवर ताबा मिळवत मारलेला फटका थेट गोलरक्षक पॉलकडे गेला. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर कोलकताने आक्रमणाचा सपाटाच लावला, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटाला बोर्जा फर्नांडेझ याचा दिशाहीन ठरला, तर 53व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या रॉबिन गुरुंग याच्या दक्षतेमुळे कोलकता पुन्हा एकदा गोल करण्यात अपयशी ठरला. कॉर्नर फटक्यावर हावियर लारा ग्रान्डे याने साऱ्यांना चकवा देत गोलरक्षक सुब्रतलाही गुंगारा दिला होता, मात्र चेंडू गोलजाळीच्या दिशेने जात असताना रॉबिन गुरुंगने कमालीची दक्षता दाखवत गोलरेषेवरून चेंडूची दिशा बदलली. उत्तरार्धातील खेळ खूपच रंगतदार होता. 69व्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या वेलेझ याला गोल करण्याची आणखी एक संधी होती, मात्र बोर्जा हर्नांडेझ याच्या दक्षतेमुळे यजमान संघावरील संकट टळले. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टला आघाडी फुगविण्याची सुरेख संधी होती, परंतु एमिलियानो अल्फारो याने ही संधी वाया घालविली. अल्फारोचा कमजोर प्रयत्न कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार अडवून संघावरील संकट टाळले.]]>