पूरूषांच्या भालाफेक स्पर्धेत तब्बल ८८.०६ मीटर भाला फेकत नीरज चोप्राने आपल्या सर्वाधिक कामगिरीसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. जकार्ता: भारतासाठी ऍथलेटिक्समध्ये विक्रमी कामगिरी करीत युवा नीरज चोप्राने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत ८८.०६ इतका लांब भाला फेकत भारताला आठवे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत आपल्या तिसऱ्याच प्रयत्नात इतका लांब भाला फेकत नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ येथे चालू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली. २०१६ साली पोलंड येथे झालेल्या विश्व अंडर २० चॅम्पियन्सशिप स्पर्धेत ८६.४८ मीटर भाला फेकत जुनियर स्पर्धेत विश्वविक्रम करीत नावारूपाला आलेल्या नीरजने आतापर्यंत भारतासाठी युवा तसेच वरिष्ठ स्पर्धांत भरभक्कम कामगिरी केली आहे. मागच्या वर्षी झालेल्या आशियायी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक फटकावून दिले होते. शिवाय या वर्षी जून महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी करीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. ऍथलेटिक्समध्ये भारताची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. गोळाफेक स्पर्धेत तजींदरपाल सिंगने सुवर्णपदक फटकावत आणखी एका विक्रमाची नोंद केली तर हिना दास (महिला ४०० मीटर), दूती चंद (महिला १०० मीटर), मोहम्मद अनस (पुरुष ४०० मीटर), अय्यासामी धरून (पुरुष ४०० मीटर हर्डल), सुद्धा सिंग (महिला ३००० मीटर स्टीपलचेस) व नीना वराकील (महिला लांब उडी) यांनी रौप्य पदक फटकावत ऍथलेटिक्समध्ये भारताची पदसंख्या एकूण आठवर आणली आहे.]]>