अफगाणिस्तान पुढील दोन-तीन वर्षात टॉप ५-६ मध्ये असेल – गुलबदिन नाईब

लीड्स: काल (दि. ४ जुलै) वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानला २३ धावांनी पराभूत करीत ख्रिस गेलचा शेवट गोड केला. या स्पर्धेत क्वालिफायरद्वारे पात्र झालेल्या या दोन संघांना तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानला खेळलेल्या सर्वच्या सर्व सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य गोलंदाज रशीद खान, मुजीब-उर-रेहमान, मोहम्मद नबी या गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका अफगाणिस्तानला बसला असे म्हटले तरी वावगळ ठरणार नाही.

कालच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नाईब याला अफगाणिस्तान क्रिकेटच्या पुढील भवितव्याबद्दल विचारले असता येणाऱ्या दोन-तीन वर्षांच्या काळात अफगाणिस्तान क्रिकेट नक्कीच आपला सर्वोत्तम खेळ प्रदर्शित करेल असे मत व्यक्त केले.

“आम्ही फारच कमी वेळेत बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. अगदी कमी वेळेत. आणि हे क्रिकेट आहे. विश्वचषकातील सुमार कामगिरीमुळे आमचे क्रिकेट येथे संपले नाही. आमच्यासाठी क्रिकेट बरेच काही आहे. आम्ही येथे आलो आणि चांगले क्रिकेट खेळलो. बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि आज वेस्ट इंडिज. आम्ही विजयाच्या खूपच जवळ आलो होतो. परंतु हे क्रिकेट आहे. नक्कीच, आमची सुरुवात गडबडीत झाली. जर आम्ही सुरुवात चांगली केली असती तर परिणाम काहीसा वेगळा दिसला असता. अल्लाहची मेहेरबानी असेल तर नक्कीच आम्ही पुढचा विश्वचषक खेळू. येणाऱ्या दोन-तीन वर्षांत आम्ही टॉप पाच-सहा मध्ये असू. तसा प्रयत्न तर नक्कीच करू,”

“एक गोष्ट मात्र नक्की आम्हाला या विश्वचषकाने शिकवली. आमच्या कडून ज्या चुका झाल्या त्यातून आम्ही नक्कीच धडा घेऊ आणि आगामी काळात त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आम्ही या स्पर्धेतून सकारात्मक गोष्टी आत्मसात करू, ज्याने अफगाणिस्तान क्रिकेटला चांगला फायदा होईल.” नाईबने आपली प्रामाणिक प्रतिक्रिया या वेळेस व्यक्त केली.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *