कोची, दिनांक 24 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये केरळा ब्लास्टर्सची शुक्रवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी पुणे सिटीविरुद्ध लढत होत आहे. केरळा घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठण्याची चांगला संधी असल्याचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांना वाटते. केरळा सध्या पहिल्या चार संघांमध्ये नाही. 11 सामन्यांतून त्यांचे 15 गुण आहेत. पुण्याचेही तेवढेच गुण असले तरी सरस गोलफरकामुळे त्यांचा चौथा क्रमांक आहे. पाचव्या क्रमांकावरील केरळाने मोठ्या फरकाने विजय मिळविला तर त्यांना मुंबई सिटी एफसीनंतर थेट दुसरे स्थान गाठता येईल. केरळाचे केवळ तीन सामने बाकी असल्यामुळे कॉप्पेल यांना निर्णायक विजयाचे महत्त्व ठाऊक आहे. घरच्या मैदानावरील संघाची प्रभावी कामगिरी त्यांच्यासाठी उत्साहवर्धक आहे. घरच्या मैदानावर केरळाने केवळ तीन गोल स्वीकारले आहेत. मुंबई सिटीसह संयुक्तरीत्या ही सर्वोत्तम कामगिरी आहे. घरच्या मैदानावर सलग तीन सामने जिंकलेला केरळा हा एकमेव संघ आहे. ऍटलेटीको डी कोलकता संघाविरुद्ध हरल्यानंतर त्यांनी घरच्या मैदानावर सलग चार सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. कॉप्पेल यांनी सांगितले की, 11 सामने झाल्यानंतर आम्हाला अजूनही पात्रतेची संधी आहे. आम्ही क्षमतेनिशी खेळ केला तर चांगली संधी असेल. मोसमाच्या प्रारंभी हेच आमचे ध्येय होते. पहिले तीन सामने झाल्यानंतर आम्हाला एकच गुण मिळाला होता. त्यामुळे आम्हाला संधी नसल्याची चर्चा सुरू झाली होती, पण आम्ही झुंजार खेळ केला. कसून सराव केला आणि बचाव भक्कम ठेवायचा प्रयत्न केला. हरल्यानंतर आम्ही अकारण गडबडून गेलो नाही. त्याचवेळी जिंकल्यानंतरही अवास्तव भाष्य केले नाही. 14 सामने झाल्यानंतरच प्रत्येक संघाचे मूल्यमापन होईल. मागील सामन्यात केरळाचा मुंबईकडून 0-5 असा धुव्वा उडाला, पण याचा या लढतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कॉप्पेल यांना वाटते. ते म्हणाले की, तो सामना आता संपला आहे. त्यातून जे काही शिकता येईल ते आम्ही शिकलो आहोत. आम्हाला मुंबईच्या संघाचा आदर वाटतो. त्यांचा संघ फार चांगला आहे. सर्वोत्तम फॉर्म त्यांनी प्रदर्शित केला आहे. आम्ही पुण्याविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहोत. पुण्याचे 12 सामन्यांतून 15 गुण झाले आहेत. त्यांना विजय अनिवार्य आहे. ते चौथ्या क्रमांकावर असले तरी पुढील दोन सामन्यांतून कमाल तीन गुण मिळाले नाहीत तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. पुण्याचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास सर्दी-तापामुळे आजारी आहेत. त्यामुळे सहायक प्रशिक्षक डेव्हिड मॉलीनर पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. त्यांनी सांगितले की, सहा-सात संघांना आगेकूच करण्याची संधी आहे. एटीकेविरुद्ध जिंकल्यास गोव्याला सुद्धा संधी असेल. आम्ही गुवाहाटीत हरल्यामुळे आम्हाला विजय महत्त्वाचा असेल. हा सामना गमावला आणि पुढील सामना जिंकला तर पुण्याला कमाल 18 गुण मिळतील. आयएसएलमध्ये आतापर्यंत 19 पेक्षा कमी गुण मिळविलेला एकही संघ उपांत्य फेरी गाठू शकले नाही. त्यामुळे केरळाचा बचाव भेदून पात्रतेच्या मार्गावरील वाटचाल कायम ठेवण्याचे आव्हान पुण्यासमोर असेल.]]>