पुणे:हिरो इंडियन सुपर लिगमध्ये बुधवारी चौथ्या मोसमाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात एफसी पुणे सिटी आणि बेंगळुरू एफसी यांच्यात चुरशीचा सामना अपेक्षित आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही लढत होईल. साखळी टप्यात संघर्षपूर्ण खेळ करून ही मजल मारलेले दोन्ही संघ अंतिम फेरीतील प्रवेशाच्या निर्धाराने खेळतील. बेंगळुरूने पदार्पणात साखळीत अव्वल स्थान मिळविले, तर पुण्याने चौथ्या क्रमांकासह ही कामगिरी केली. दोन्ही संघ आक्रमक खेळ करतात. मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने आल्यानंतर त्यांच्याकडून याच शैलीचा खेळ अपेक्षित आहे. एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांनी सांगितले की, खेळाच्या शैलीत बदल करण्याची ही वेळ नाही. आता बदल केले तर ते उपयुक्त ठरणार नाहीत. साखळी खेळताना काही सामने तुमच्या हाताशी असतात. आता आम्हाला सावध राहावे लागेल. आता दोन सामने आहेत आणि बुधवारी काहीच नक्की होणार नाही. आम्हाला अंतिम फेरीसाठी दोन्ही सामन्यांत चांगला खेळ करावा लागेल. संघाच्या डावपेचांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हे समीकरण अगदी सोपे आहे. आम्हाला शक्य तेवढे गोल करावे लागतील आणि शक्य तितके कमी पत्करावे लागतील. ते केले तर आम्ही अंतिम फेरीत असू. संपूर्ण मोसमात केला तसाच नैसर्गिक खेळ आम्हाला करावा लागेल. आम्ही मोसमात चांगला खेळ केला असल्यामुळे आता अंतिम ध्येय साध्य करू शकलो नाही तर ते निराशाजनक ठरेल. मागील सामन्यास मुकलेला मार्सेलिनीयो आणि एमिलियानो अल्फार हे दोघे महत्त्वाच्या लढतीसाठी उपलब्ध असतील. हे दोघे नसणे म्हणजे बार्सिलोनात लिओनेल मेस्सी व सुआरेझ नसण्यासारखे आहे, असे पोपोविच म्हणाले. येथे झालेल्या मागील सामन्यात बेंगळुरूने 3-1 असा विजय मिळविला होता. याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचा बेंगळुरुचा प्रयत्न राहील. बेंगळुरूचे सहाय्यक प्रशिक्षक नौशाद मुसा पत्रकार परिषदेला उपस्थित होते. साखळीत अव्वल स्थान मिळविले असले तरी हा सामना सोपा नसेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पहिल्या सामन्यात आम्ही खेळलो तेव्हा पुण्याने आघाडी घेतली होती, पण त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्ड मिळाले. त्यानंतर आम्ही तीन गोल केले. एफसी पुणे सिटी हा खडतर प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास आम्ही आतूर आहोत. पुणे सिटीने संपूर्ण मोसमात आक्रमक खेळ केला असला तरी त्यांच्या बचाव फळीबाबत प्रश्नचिन्ह आहे. याचा फायदा उठविण्याचा बेंगळुरूचा प्रयत्न राहील. बाद फेरीतील पहिला सामना प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळणे ही प्रतिकूल बाब नसल्याचे मुसा यांनी स्पष्ट केले. अवे सामन्यांत बेंगळुरूची कामगिरी उत्तम झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुसा पुढे म्हणाले की, सकारात्मक खेळ करायचा आणि जिंकायचे हेच आमचे धोरण आहे.]]>