अभिषेकच्या झंझावातापुढे इंग्लंड हतबल, मालिका ४-१ ने जिंकली

Abhishek-Sharma-after-completing-his-hundred

मुंबई (भास्कर गाणेकर): हाऊसफुल वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माने प्रत्येक चेंडूंगणिक प्रेक्षकांना खुश करीत सामना एकहाती भारताला जिंकून देत पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. विक्रमी खेळीनंतर त्याने दोन विकेट्सही घेत अष्टपैलू कामगिरीचा नजराणा पेश करीत इंग्लंडला चारीमुंड्या चित केले. षटकारांची आतिषबाजी झाल्यानंतर उरलेली कसर भारतीय गोलंदाजांनी पूर्ण करीत पाहुण्यांना केवळ ११व्या षटकात गुंडाळत ९७ धावांत खुर्दा पडला.

वानखेडेवर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा मिळतो हि बाब लक्षात घेऊन जोस बटलरने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. यंग ब्रिगेडने अगदी पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरवात केली ती एका मागून एक विक्रम करण्यापर्यंत.

सॅमसनने आर्चरला पहिल्या षटकात १६ धावा ठोकल्यानंतर तो पुढच्याच षटकात बाद झाला. पण त्याची हि सुरुवात अभिषेक शर्माने दुसऱ्या बाजूने वेगळ्याच उंचीपर्यंत नेऊन ठेवली. अभिषेकने जणू डावाची पूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने पाचव्या षटकातच अर्धशतक ठोकत भारताला पावरप्लेपर्यंत भारताला ९७ धावांपर्यंत पोहोचवत एक नवा विक्रम रचला. तो इथेच न थांबता केवळ ३७ चेंडूंत आपले शतक झळकावत दुसरा वेगवान भारतीय होण्याचा मानही फटकावला. सात चौकार व तब्बल १३ षटकार खेचत त्याने केवळ ५४ चेंडूंत १३५ धावांची विक्रमी खेळी. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी हि सर्वोत्तम खेळी ठरली. तिलक वर्मा (२४), शिवम दुबे (३०) यांच्या छोट्या खेळ्या भारतासाठी वरदान ठरल्या आणि भारताने २४७ धावांचा पल्ला गाठला. तर कर्णधार सूर्यकुमारचा खराब फॉर्म आजच्या सामन्यातही दिसला. आपल्या विशेष शैलीत फटका मारण्याच्या नादात तो केवळ दोन धावांत बाद झाला. इंग्लंडसाठी ब्रायडन कार्सने तीन तर मार्क वूडने दोन गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पाहुण्या इंग्लंडने मात्र हाऊसफुल प्रेक्षकांना निराश केले. एक कांटे-की-टक्कर पाहण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना अगदी दहा वाजण्याच्या आताच घराचा रस्ता धरावा लागला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक व भेदक गोलंदाजी करीत केवळ ६० मिनिटांत आणि ११व्या षटकात इंग्लंडला ९७ धावांवर गुंडाळत सामना १५० धावांनी जिंकला व मालिकाही ४-१ अशी जिंकली.

फिल सॉल्टचा अपवाद वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आले नाही. सॉल्टच्या ५५ धावा व जेकब बेथेलच्या १० धावा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मोहम्मद शमी (३), वरुण चक्रवर्ती (२) या प्रमुख गोलंदाजांसोबतच अष्टपैलू शिवम दुबे व आजचा शतकवीर अभिषेक शर्मानेही दोन गडी बाद करीत पाहुण्यांना शंभरीही गाठू दिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *