युवा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५-० ने लोळवत पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचा श्रीगणेशा केला. भुवनेश्वर: मायदेशात खेळणाऱ्या भारतीय संघाने येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या ‘क’ गटाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५-० ने पराभूत करीत हॉकीच्या सर्वात मोठ्या स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली. नव्या खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने पाहुण्यांना जरी आरामात हरविले असले तरी त्यांचा पुढचा सामना बेल्जीयम बरोबर होणार आहे. सुरुवातीला दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. भारतासाठी नवीन खेळाडूंचा भरणा होता. शिवाय घराच्या प्रेक्षकांसमोर मोठ्या स्पर्धेत प्रदर्शन करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्र घेतल्यामुळे कोणालातरी पुढे येऊन आक्रमकता दाखविणे गरजेचे होते. त्यातच भारताला सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तीन वेळेस गोल करण्याची संघी मिळाली होती. परंतु त्यांना यश मिळालं नाही. शेवटी, १० व्या मिनीटाला मनदिप सिंहने पेनल्टी कॉर्नरवर तयार झालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करुन भारताला सामन्यात १-० अशी पहिली आघाडी मिळवून दिली. लगेचच १२ व्या मिनिटाला आकाशदीप सिंहने आणखी एक गोल धाडीत आफ्रिकेला धक्का दिला. पहिल्या सत्र अखेरीस भारताकडे २-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सावध पवित्रा घेत भारताच्या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिले. शिवाय, त्यांच्या बचाव फळीने केलेल्या सुरेख खेळीला भेदणे भारतीय खेळाडूंना काहीसे कठीण झाले. भारताकडून निलकांत शर्मा, हार्दिक सिंहने आफ्रिकीच्या खेळाडूंना चकवत आश्वासक खेळ केला, मात्र गोल करण्यात ते अपयशी ठरले. सत्राअखेरीस भारताची आघाडी २-० अशी कायम होती. सामन्याच्या दुसऱ्या भागात रंगत आणखीच वाढत गेली. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन आघाडी वाढवण्याची संधी मिळाली होती, मात्र या संधीचं रुपांतर गोलमध्ये करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले.दक्षिण आफ्रिकेनेही पुनरागमन करण्यासाठी भारताची बचाव फळी भेदली पण गोल मात्र करता आली नाही. अखेर ४३ व्या मिनीटाला मनदीप सिंहने दिलेल्या पासला सिमरनजीत सिंहने हलकेच गोलपोस्टची दिशा दाखवून भारताची आघाडी ३-० ने वाढवली. लगेचच ४५ व्या मिनीटाला आकाशदीपच्या पासवर ललित कुमार उपाध्यायने सुरेख गोल करीतभारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत सिमरनजीतने गोल धाडले आणि भारताची आघाडी ५-० अशी वाढवली. उरलेल्या मिनिटांतही भारताने गोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या बचाव फळीने भारताच्या आक्रमणाला लगाम लावला. भारताने आपली ५-० ची आघाडी शेवटपर्यंत टिकवत सामना एकतर्फी जिंकला. भारताचा पुढील सामना बेल्जीयमविरुद्ध २ डिसेंबरला होईल.]]>