दिल्ली, दिनांक 13 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी दिल्ली डायनॅमोज आणि ऍटलेटिको द कोलकता यांच्यातील सामना नाट्यमय ठरला. पूर्वार्धातील पिछाडी, एक खेळाडू कमी होणे, गमावलेला पेनल्टी फटका अशा प्रतिकूल घटना घडूनही यजमान संघाने 2-2 अशी गोलबरोबरी नोंदवत अग्रस्थान कायम राखले. सामना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. झुंजार खेळ केलेल्या दिल्ली डायनॅमोजला संपूर्ण उत्तरार्ध दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांच्या बदारा बादजी याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे 44व्या मिनिटास मैदान सोडावे लागले. नंतर उत्तरार्धात कोलकत्याचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने फ्लोरेंट मलुडा याचा पेनल्टी फटका अडविला, मात्र मलुडा यानेच 74व्या मिनिटाला नोंदविलेला नेत्रदीपक मैदानी गोल दिल्लीला एक गुण मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. इयान ह्यूम याने 17व्या मिनिटास कोलकत्यास आघाडी मिळवून दिली. 63व्या मिनिटाला मिलन सिंग याने यजमान संघास 1-1 अशी बरोबरी साधून दिली, तर 71व्या मिनिटाला हावियर लारा ग्रान्डे याने कोलकत्यास 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती, मात्र लगेच तीन मिनिटांनी मलुडाच्या गोलमुळे दिल्लीने पुन्हा गोलबरोबरी साधली. गोलबरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. दिल्लीची ही यंदाच्या स्पर्धेतील पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे दहा सामन्यातून 17 गुण झाले असून केरळा ब्लास्टर्स व मुंबई सिटी एफसी या संघावर दोन गुणांची आघाडी मिळविली आहे. कोलकत्याचे नऊ सामन्यातून 13 गुण झाले असून त्यांचा चौथा क्रमांक कायम आहे. ऍटलेटिको द कोलकता संघ पूर्वार्धात एका गोलने आघाडीवर होता. कॅनेडियन इयान ह्यूम याने केलेल्या गोलमुळे पाहुण्या संघाने वर्चस्व राखले. त्यानंतर विश्रांतीला एक मिनिट बाकी असताना दिल्लीला जबर धक्का बसला. त्यांच्या बदारा बादझी याला सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाले, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. यामुळे उत्तरार्धात यजमान संघ दहा खेळाडूंसह खेळणार हे स्पष्ट झाले. सामीग दौती याने दिलेल्या सुंदर पासवर ह्यूमने चेंडू नियंत्रित केला. त्यानंतर प्रतिस्पर्धी गोलरक्षक अंतोनियो सांताना याला गुंगारा देत ह्यूमने आयएसएल स्पर्धेतील यंदाचा आपला चौथा गोल नोंदविला. त्यानंतर कोलकत्यास आघाडी फुगविण्याची सुरेख संधी होती, परंतु 34व्या मिनिटाला त्यांचे आक्रमण सफल ठरले नाही. यावेळी हेल्दर पोस्तिगा याचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही याची दक्षता गोलरक्षक सांतानाने घेतली.44व्या मिनिटाला बदारा याला जाणूनबुजून चेंडू हाताळणे महागात पडले. रेफरींनी त्याला दुसरे यलो कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठविले. फ्लोरेंट मलुडाच्या क्रॉसपासवर चेंडू हेड करण्याऐवजी बदाराने हात लावला. संघातील स्ट्रायकरच्या चुकीच्या कृतीने प्रशिक्षक जियानलुका झांब्रोटाही कमालीचे वैतागले. बादजी याला सामन्यातील पहिले यलो कार्ड विसाव्या मिनिटाला मिळाले होते. सामन्याच्या 61व्या मिनिटाला दिल्लीला बरोबरी साधण्याची आयती संधी होती, मात्र कोलकत्याचा गोलरक्षक देबजित मजुमदार याने फ्लोरेंट मलुडाच्या पेनल्टी फटक्याचा अचूक अंदाज बांधत चेंडू अडविला. गोलरिंगणात दिल्लीच्या मार्सेलो लैते परेरा याला कोलकत्याच्या प्रबीर दास याने पाडल्यानंतर रेफरींनी पेनल्टी फटक्याची खूण केली होती. पेनल्टी फटका अडविल्याचा कोलकत्याचा आनंद तीनच मिनिटे टिकला. युवा खेळाडू मिलन सिंग याच्या ताकदवान फटक्यावर दिल्लीने बरोबरी साधली. उजव्या बगलेकून मिळालेल्या चेंडूवर मिलनने अप्रतिम फटका मारत गोलरक्षक मजुमदारचा बचाव भेदला. हावियर लारा ग्रान्डे याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलमुळे कोलकताने 71व्या मिनिटास पुन्हा आघाडी मिळविली. लालरिनडिका राल्टे याने मारलेला फटका रोखला गेला, परंतु यावेळी चेंडू लारा याच्याकडे गेला. त्याने स्वतःला नियंत्रित करत प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवा देत चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. मात्र पाहुण्या संघाची ही आघाडी आणखी तीनच मिनिटे टिकली. मलुडा याने पेनल्टी गमावल्याची भरपाई करताना दिल्लीला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. चेन्नईयीनविरुद्ध मागील सामन्यात दोन गोल केलेल्या फ्रान्सच्या या अनुभवी फुटबॉलचा गोल नेत्रदीपक ठरला. डॅव्हिड ऍडी याने डाव्या बगलेतून दिलेल्या क्रॉसपासवर चेंडू मलुडा याला मिळाला. दिल्लीच्या कर्णधाराने हेन्रिक सेरेनो आणि होझे लुईस अर्रोयो या दोघा प्रतिस्पर्धी बचावपटू चकवत नंतर गोलरक्षक मजुमदार यालाही गुंगारा देत गोलची नोंद केली.]]>