मुंबई, दिनांक 13 डिसेंबर 2016 – सामन्यात दहा खेळाडूंसह खेळूनही अॅटलेटिको द कोलकता संघाने मुंबई सिटी एफसीला वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील लढतीत गोलशून्य बरोबरी नोंदविली. कोलकताने पहिल्या टप्प्यातील विजयाच्या बळावर गोलसरासरीत 3-2 अशी बाजी मारून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामना मंगळवारी येथील फुटबॉल अरेनावर झाला. कोलकता येथे झालेल्या पहिल्या टप्प्यातील उपांत्य लढतीत अॅटलेटिको द कोलकताने मुंबई सिटीस 3-2 अशा फरकाने हरविले होते. त्यामुळे आयएसएल फुटबॉलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना आज फक्त बरोबरीही पुरेशी होती. अपेक्षेनुसार सामना बरोबरीत राखून त्यांनी अंतिम लढतीतील जागा पक्की केली आणि प्रशिक्षक होजे मॉलिना यांच्यासह कोलकत्याच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. सामन्याच्या 42व्या मिनिटाला एका खेळाडूस रेड कार्ड मिळाल्यानंतर दहा खेळाडूंसह खेळावे लागलेल्या कोलकत्याने उत्तरार्धात मुंबई सिटीला चांगलेच सतावले. आपला एक खेळाडू कमी झाल्याचा लाभ मुंबई सिटीला मिळणार नाही याची दक्षता कोलकताने घेतली. मुंबई सिटीला गमावलेल्या संधी चांगल्याच महागात पडल्या. सामन्याच्या स्टॉपेज टाईममधील शेवटच्या मिनिटास आणखी दोघा खेळाडूंना रेड कार्ड मिळाले. मुंबई सिटीच्या बदली खेळाडू थियागो कुन्हा आणि अॅटलेटिको द कोलकताच्या ज्युआन बेलेन्कोसो यांना रेफरींनी शिक्षा केली. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले होते. अॅटलेटिको द कोलकता संघाने 2014 मध्ये विजेतेपद मिळविले होते. यंदाच्या अंतिम लढतीत येत्या 18 डिसेंबरला कोची येथे त्यांची लढत केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यातील विजेत्याशी पडेल. सामन्याचा पूर्वार्ध नाट्यमय ठरला. विश्रांतीच्या शिट्टीला तीन मिनिटे बाकी असताना कोलकतास मोठा धक्का बसला. सामन्याटच्या 42व्या मिनिटाला रेफरींनी त्यांच्या रॉबर्ट लाल्थ्लामुआना याला रेड कार्ड दाखविले. त्यामुळे पाहुणा संघ उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळेल हे नक्की झाले. मुंबई सिटीच्या मातियास डिफेडेरिका याला धोकादायकरीत्या मागून अडथळा आणल्याबद्दल रेफरींनी रॉबर्टला सामन्यातील दुसरे यलो कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. रॉबर्टला सामन्यातील पहिले यलो कार्ड सामन्याच्या 34व्या मिनिटाला मिळाले होते. मागील लढतीत मिळालेल्या रेड कार्डमुळे दिएगो फोर्लान निलंबनामुळे आजच्या सामन्यास मुकला. त्यांच्या अनुपस्थितीत भारताचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री याने मुंबई सिटीचे नेतृत्व केले. छेत्रीस मुंबईला आघाडीवर नेण्याची संधी सुरवातीसच लाभली होती. मध्यक्षेत्रातून लुसियान गोईयान याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर ताबा राखल्यानंतर छेत्रीसमोर फक्त गोलरक्षक देबजित मजुमदार होता. मात्र त्याने चेंडू थेट गोलरक्षकाच्या हाती मारून मोठी चूक केली. सामन्याच्या साठाव्या मिनिटास कोलकत्याचा हावियर लारा ग्रान्डे याने मुंबई सिटीच्या बचावफळीवरील दबाव वाढविला होता, परंतु तो यशस्वी ठरला नाही. सामना संपण्यास फक्त एक मिनिट बाकी असताना मुंबई सिटीने गोल करण्याची आणखी एक सुवर्णसंधी वाया घालविली. मात्र अगोदर लुसियान गोईयान, तर नंतर जॅकिचंद सिंग अचूक नेम साधू शकला नाही. यजमान संघाला आज अनुभवी खेळाडू दिएगो फोर्लान याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.]]>