एकपत्नीव्रत : नवयुगनिर्मितीचा विचार करताना प्रथम विचार करावा लागेल त्याच्या एकपत्नीव्रताचा. राम जन्मला त्या वेळी दशरथाला, रामाच्याच जन्मदात्याला तीनशे पन्नास बायका होत्या! त्या काळच्या व त्यापूर्वीच्या सर्वच राजांना व बहुतेक पुरुषांना अनेक बायका असत. अनेक बायका असल्या तर पुरुष एकीवर पूर्ण प्रेम करू शकत नाही. कुठल्याच स्त्रीला त्यामुळे समाधान मिळत नाही. स्त्री समाधानी नसेल तर घरात समाधान राहात नाही, सुख नांदत नाही. साहजिकच पुरुषालाही सुखसमाधान मिळत नाही. म्हणूनच एक पत्नी असणे महत्वाचे ठरते. एकाच पुरुषाला अनेक स्त्रिया असतील तर उरलेल्या पुरुषांपैकी काहींना बायका मिळणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे असे पुरुष अनाचार करू लागतात. एका पतीच्या अनेक बायकांपैकी काही बायका प्रेम मिळत नसल्यामुळे अनाचाराकडे झुकतात, हे उघड आहे. यामुळे समाजाची घडी विस्कळित होते व गुन्हे वाढतात, म्हणून एकपत्नीव्रत महत्वाचे ठरते. स्त्रीलासुद्धा आत्मा आहे, मन आहे, विचार आहे. पुरुष व स्त्री हे दोघेही तितकेच महत्वाचे घटक आहेत. तेव्हा दोघांना सारखाच न्याय हवा या दृष्टीनेही एकपत्नीव्रत महत्वाचे आहे. स्वतःच्याच घरातील अनेक मातांची स्थिती पाहून रामाने पूर्ण विचार करून एकपत्नीव्रत अंगीकारले. त्यामुळेच तो युगपुरुष ठरला! मातृप्रेम : रामाने आपल्या सर्व मातांवर अतोनात प्रेम केले. कैकयी सावत्र असूनही तिच्यावर रामाने खूप प्रेम केले. कैकयीनेही तितकेच प्रेम रामावर केले होते. रामाचे राज्य कैकयीने काढून घेतले तरी राम तिच्यावर रागावला नाही. तिची बाजू सत्याची होती हे पाहून स्वतःचे होणारे नुकसान त्याने सहन केले. सगळे लोक भरीला घालीत असतानाही त्याने धर्माचरण सोडले नाही! सत्याचा अपलाप केला नाही. त्यानंतरही कैकयीवरच्या प्रेमात त्याने काही फरक केला नाही. राम स्वयंसिद्ध मोठा होता. कौसल्येमुळे राम महान झाला असे म्हणणे चूक आहे. कारण राम नेहमी कैकयीजवळच राहात असे. बंधुप्रेम : घरोघर मातीच्याच चुली, त्याप्रमाणे घरोघर भाऊबंदकी ही ठरलेलीच असते. रामाच्या घरी भाऊबंदकी निर्माण व्हावयाचा क्षण आलेला होता. लक्ष्मण व कौसल्या हे उभयता भाऊबंदकी चालू करायला उद्युक्त झाले होते; पण रामाने मोठ्या निग्रहाने हा प्रसंग सावरला. भारतातच नव्हे तर सर्व जगतात भाऊबंदकीमुळे राज्ये नाश पावली आहेत, घराणी धुळीला मिळाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामाचा हा मनोनिग्रह मोठा विलक्षण वाटतो. स्वतः पिता व माता सांगत असूनही राज्य बळकावयाला तो तयार झाला नाही! रामाने भांडाभांडी करून राज्य घेतले असते, तर आज आपण रामायण वाचलेही नसते. हाही गुण युगपुरुषत्वाचा कारक ठरतो. लेखक:- डॉ. प. वि. वर्तक संकलन:- गो.रा.सारंग (९८३३४९३३५९)]]>