घराप्रमाणे देशाचेही भविष्य स्त्रियांच्या हाती आहे. ते जाणून या देशातील प्रत्येक स्त्रीने आता स्वसंरक्षणा सोबत राष्ट्राचेही रक्षणार्थ पुढे यावे. श्री नवरात्रोत्सव निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे भाषण पुन्हा एकदा आपल्यासाठी… स्त्रियांच्या सभेत बोलताना सावरकर म्हणाले, “आजच्या स्त्रियांत मुख्य अुणीव धैर्याची आहे. देशकार्यार्थ घराबाहेर पडणाऱ्या पुरूषाने दाराआड मुसमुसून पत्नी पाहिली की त्याचे धैर्य खचते म्हणून स्त्रियांनी माता विदुलेप्रमाणे आपल्या मुलांना पळून न येता लढण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. रामाने सीतेला वनातील अनेक धोके दाखवले तरीही सीता त्यांच्या समवेत वनवासांत गेली. हे धैर्य हवे. झांशीच्या राणीचा पराक्रम हा आपला आदर्श असला पाहिजे. कारण ती मुलगीच पुढच्या पिढीची जननी आहे. भावी पिढी तेजस्वी नि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे अशी तुमची अिच्छा असेल तर मुलींच्या जोपासनेकडेही तुम्ही योग्य लक्ष दिले पाहिजे. योग्य वय होअीपर्यंत त्यांचा विवाह करू नये. मुलींची अशी समजूत असते की अशक्तपणा म्हणजे नाजूकपणा व तो अेक कौतुकास्पद गुण आहे. पण ती त्यांची समजूत चूक आहे. सशक्तपणा हेच खरे सौंदर्य. अीश्वर निर्मित सौंदर्य आपल्या हातचे नाही. पण हे सौंदर्य आपल्या हातचे आहे. परदेशातील स्त्रिया पुरूषांप्रमाणेच सशक्त असतात. आपल्याकडे त्या अशक्त होत आहेत याचा वाअीट परिणाम पुढील पिढ्यांवर होअील. तो होअू नये अिकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. पूर्वी जशी त्यांस देवाची गाणी शिकवीत तशी आता देशाची गाणी शिकविली पाहिजेत. तुम्ही आजची वृत्तपत्रे वाचून देशाची आजची स्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे. ” या सभेला वीर सावरकरांच्या पत्नी सौ. यमुनाबाअी याही अुपस्थित होत्या. संदर्भ :- विविध भाषणे, स्वातंत्र्यवीर सावरकर]]>