रायगड: दिसायला किळसवाणा तरिही स्वभावाने खूपच शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्षाचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत आहे. सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री याने गिधाडांची संख्या नेसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे. श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलिकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिलं तर आकाशात घिरट्या घालणारा पक्षांचा थवा आपल्या नजरेत येतो, तो पक्षी म्हणजे गिधाड. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले आहे. या चिरगाव-बागेची वाडी येथील ३१.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात सातवीण, आंबा, अर्जून, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची २३ ते २४ घरटी पाहायला मिळतात. घरटीच्या आसपास २२ ते २३ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३८ ते ४० गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी १३ वर्षापासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. पक्षीमित्र व सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की, भारत देशातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती आपल्या रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचा गिधाड. या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. २००० ते २००४ मध्ये चिरगाव याठिकाणी पांढऱ्या पाठीच्या गिधाडाच्या कॉलनीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची दोन घरटी आढळली. आता आजमितीस २०१६ पर्यंत या गिधाडांच्या घरट्यांची संख्या २४ झालेली आहे’ तर या जातीची एकूण गिधाडांची संख्या १५० पर्यंत पोहचलेली दिसून येते. ही संख्या इथलं जंगल वाढवण्यात इथल्या ग्रामस्थांनी व विशेषतः तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले आहे. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या वीणेच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. जे पूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली ढोरटाकी बंद केल्यामुळे त्यांना मृत जनावरे मिळत नव्हती. येथील संवर्धनाचं वैशिष्ट्य म्हणजे या गिधाडांना बंदिस्त न करता त्यांना निसर्गात विहरू देत त्यांना त्यांचेच खाद्य नैसर्गिक पद्धतीने भक्षण करण्यास दिल्यामुळे हा बदल दिसून आला आहे असेही मेस्त्री यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.. गेली तेरा वर्ष नियमितपणे या गिधाडांना अन्न पुरविण्याचे काम सिस्केप संस्थेने केले आहे. २०० किलोमीटरच्या अंतरात कुठेही जनावर मृत झाले तर सिस्केप संस्थेला याची कल्पना दिली जाते. सिस्केप संस्थेचे सदस्य या मृत जनावरांची रितसर परवानगी घेत वाहतूक करून चिरगाव येथील नव्याने निर्माण केलेल्या ढोरटाकीवर गिधाडांसाठी टाकली जातात. यात स्थानिक ग्रामस्थांची मदतही होते. गिधाडांना अन्न पुरविण्याच्या कामी संस्थेने अनेक दात्यांकडून तर कधी स्वताच्या खिशाला चाट देऊन प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाडांसाठी जिवापाड मेहनत घेतली. लाखो रुपये याकरीता जमविले आणि संपविले. चिरगावच्या ग्रामस्थांनी सिस्केपच्या या उपक्रमाला पहिल्यापासून साथ दिली. या गावातील ही देवरहाटी म्हणजे देवराई आज काही प्रमाणात त्यांनी जपली, परंतु गावाशेजारील भागातील इतर ग्रामस्थांनी त्यांची जमीन वृक्षतोड करणाऱ्यांना दिल्याने आजुबाजूचे पठारावरील जंगल कमी झालेले दिसत आहे. पण वाढत्या गिधाडांमुळे चिरगाव गाव जगाच्या नकाशात ठळक दिसेल म्हणून आता सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. चिरगावचे माजी सरपंच किशोर घुलघुले यांनी आपल्या प्रतिक्रियेत सागर मेस्त्री यांनी सांगितल्यावर आम्हाला कळलं की हा गिधाड पक्षी आहे म्हणून. आम्हाला या पक्षाविषयी काहीच माहिती नव्हती. पण याचे पर्यावरणाला मिळणारे सहाय्य ऐकून आम्ही देखील सागर मेस्त्री यांना सहकार्य करण्याचे ठरविले. सागर मेस्त्री यांना इथे राहण्यासाठी आमच्या गावकीची खोली देखील दिली होती. या ठिकाणी येऊन त्यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांच्या कामात माझा मुलगा देखील नोंदी ठेवायचा. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी या कामात संस्थेला खूप मदत केली असल्याची माहिती घुलघुले यांनी व मुंबईला असणारे राजेश बारे यांनी सांगितले. गिधाडांना बंदिस्त जाळीत न ठेवता नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या विणेच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविण्याचा हा उपक्रम सध्या देशातील पहिला उपक्रम ठरत आहे. या गिधाडांच्या संख्येत होणारी वाढ तेथील पर्यावरणाचा समतोल राखला जातोय हे निश्चित करतंय त्यामुळे आता हा समतोल पुढे कितीतरी वर्ष तसाच राखला पाहिजे. हे आव्हान खरं तर वनखात्याने स्विकारले पाहिजे. पर्यावरण खात्याने या कामाची दखल घेऊन असे प्रयोग ठिकठिकाणी करावेत अशी पक्षीमित्रांची इच्छा आहे. भविष्यात या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहिती केंद्राची स्थापना होणार असून जैवविविधता संबंधी पर्यटनातून या गावाचा विकास करण्याचा विचार सिस्केप संस्थेचा आहे. महिलांसाठी न्याहरी व भोजन व्यवस्था देऊन त्यांच्या बचत गटाला बळकटी देण्याच्या संबंधी संस्था एक पाऊल पुढे टाकणार असून यात विविध महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून कागदी व कापडी पिशव्यांचा उद्योग देऊन पर्यावरण रक्षक बनविण्याचे कामही संस्था करणार आहे. देश तसेच विदेशातून या कामाची पाहणी करण्यासाठी यातील अभ्यासक येत असतात. त्यांच्या येण्याचा फायदा येथील ग्रामस्थांना कसा होईल याचाही विचार संस्था करीत आहे. गावातील असणारा बारा महिने वाहणाऱ्या अखंड झऱ्याचा उपयोग करून येथील स्वावलंबन बळकट केले जाणार आहे. यासंबंधी प्रेमसागर मेस्त्री यांचेबरोबर ठाणे येथील पर्यावरण अभ्यासक सुहास जावडेकर यांनीही सोबत काम करण्याचे ठरविले असून, या गिधाड संवर्धन प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन प्रेमसागर मेस्त्री यांनी केले आहे. दीपक शिंद @ 8983918989 (संकलन:- श्री. वैभव शिगवण, श्रीवर्धन, रायगड)]]>