रो'हिट', गोलंदाजांनी उडवली वेस्ट इंडिजची दाणादाण

मुंबई: पहिल्या सामन्यात विजय, दुसरा सामना बरोबरीत, तिसऱ्या सामन्यात पराभव. भारतासाठी मालिकेत टिकून राहण्यासाठी विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक होता. प्रत्येक सामन्यागणिक संघात बदल करण्याची परंपरा राखत कोहलीने पंतच्या जागी केदार जाधवला तर चहलच्या जागी रवींद्र जडेजाला संघात घेतले. मागील काही सामान्यांपासून संघासाठी मधल्या फळीचे अपयश कोहलीसाठी डोकेदुखी होऊन बसली असल्यामुळेच त्याने कदाचित जाधव व जडेजा यांना संघात घेतले. चौथ्या क्रमांकासाठी रायडू बऱ्याप्रमाणे सफल होत असल्याने कोहलीला काही प्रमाणात दिलासा होता. तीन सामन्यांत केवळ ६८ धावा जमवलेल्या धवनलाही हा सामना म्हणजे धोक्याची घंटाच होती. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या मुंबईकर रोहितवर घराच्या मैदानावर कामगिरी करण्याचा दबावही होता. केवळ कोहलीचा अपवाद वगळता सर्वच भारतीय फलंदाजांवर दबाव होता. आणि याच दवाबाला झेलण्यासाठी कोहलीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं ठरवलं. आजच्या सामन्यात आवश्यक असलेला विजय ध्यानात घेऊन रोहित-धवन जोडीने डावाची सुरुवात केली. डावाला आकार देण्याचा प्रयत्न करताना या जोडीने आणखी एक अर्धशतकीय भागीदारी रचित मोठ्या धावसंख्येचा संकेत दिले. जोडी जमली असे दिसत असताना गब्बर मोठा फटका मारताना चुकला आणि संघाला पहिला धक्का दिला. मग बारी आली ती रोहित-कोहली या एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमी जोडीची. कोहली काहीसा सेट झाला आहे वाटत असताना तोही चेंडूला हलका टच करण्याच्या नादात यष्टिरक्षकडे झेल देत बाद झाला. खरी मजा आता येणार होती. मागील काही सामान्यांचा विचार केला असता भारताची मधली फळी म्हणावी तशी चमकलेली नाही. संघाला गरज असताना मधल्या फळीकडून निराशा होत गेली आणि हातातील सामने भारताने गमावले. दोन बाद १०१ धावसंख्येवरुन रोहित रायडू जोडीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा जो समाचार घेतला तो पाहण्यासारखाच होता. १६३ चेंडूंत २४३ धावांची द्विशतकीय भागीदारी रचित वेस्ट इंडिज गोलंदाजांना सळो कि पळो करून सोडले. रोहितने तब्बल साडे तीन तास खेळपट्टीवर उभे राहत १३७ चेंडूंत २० चौकार व ४ षटकार खेचत १६२ धावा कुठल्या. त्याचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये हे २१वे शतक तर सातवे दीडशतक ठरले. रायडूनेही रोहितला तितकीच चांगली साथ देत ८० चेंडूंत आपले शतक लगावले. या जोडीच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने विंडीजपुढे ३७७ धावांचा डोंगर उभारला. धोनी (२३ धावा, १५ चेंडू) व केदार जाधव (१६ धावा, ७चेंडू) यांनीही फटकेबाजी करीत भारताला डोंगर रचण्यास मदत केली. तिन्ही सामन्यात भारताला बरोबरीची टक्कर दिलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंपुढे ३७८ धावांचा लक्ष्य म्हणजे अरबी समुद्र पार करण्याइतकं मोठं  होतं. विराट कोहलीने आपल्या गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी वापरात वेस्ट इंडीजसमोर मोठी दुविधा उभी केली. कोहली व कुलदीप यादव यांनी केलेले डायरेस्ट हिटनी त्यात आणखी भर पाडली. भुवनेश्वरने भारताला खातं उघडून दिल्यानंतर झालेलं दोन झटपट धावबाद वेस्ट इंडीजवर दबाव टाकण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर खलील अहमदने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये घातक गोलंदाजी करीत चार षटकांत केवळ ११ धावा देत तीन गडी बाद केले आणि पाहुण्यांची अवस्था चौदाव्या षटकातच सहा बाद ५६ अशी बिकट झाली. या धक्यांतून वेस्ट इंडिजला शेवटपर्यंत सावरता आले नाही. वेस्ट इंडिजसाठी कप्तान जेसन होल्डरने एकाकी झुंज देत नाबाद ७० चेंडूंत नाबाद ५४ धावा केल्या. इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने वेस्ट इंडिजला १५३ धावांवर बाद करण्यात भारताला यश आलं. खलीलप्रमाणे कुलदीपनेही तीन गडी बाद करीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने सामना २२४ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. १२ वर्षांनी ब्रेबॉर्नवर एकदिवसीय सामना बीसीसीआय व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यातील मतभेदानंतर ऐन वेळेस वानखेडेवरील चौथा एकदिवसीय सामना जवळच्याच ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या या मैदानावर तब्बल १२ वर्षांनी एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. ५ नोव्हेंबर २००६ रोजी येथे शेवटचा सामना झाला होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या त्या चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला १३८ धावांवर गारद करून आठ गडी व ४१ चेंडू राखत विजय संपादित केला होता.आश्चर्याची बाब म्हणजे येथे झालेल्या आतापर्यंतच्या आठ सामन्यात भारताने केवळ एकाच सामना खेळाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध १९९५ साली झालेल्या त्या सामन्यात भारताने पाहुण्यांना सहा गड्यांनी मात दिली होती.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *