राणा 'दा', पांड्या 'ब्रदर्स' ने जिंकली मुंबई, कोलकाताच्या केला १४ वेळा पराभव

पंचांच्या दोन चुकीच्या निर्णयाने मुंबई झाली असती पराभूत, युवा राणा व पांड्या भावांनी केली अप्रतिम खेळी. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला पुन्हा एकदा लोळवत यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात केवळ १ चेंडू राखत तमाम मुंबईकर क्रिकेट रसिकांना खुश केले. शेवटच्या तीन षटकांत ४९ धावांची गरज असताना नवखे नितीश राणा व हार्दिक पांड्या यांनी कोलकाताच्या गोलंदाचाही येथेच्छ धुलाई करीत मुंबईला विजयश्री खेचून आणले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलेल्या गौतम गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. पहिल्या ४ षटकांत कोलकाताच्या तब्बल ४४ धावा कुठल्या. यात मलिंगाच्या २ षटकांत २०, मॅकग्लेघनच्या १ षटकात ९ तर बुमराला १ षटकात १५ धावा चोपल्या. बुमराचे तिसरे षटक हे कोलकातासाठी चांगलेच फायदेशीर ठरले. यात बुमराने २ नो बॉल टाकत गौतम गंभीरला दोन वेळा फ्री हिटची संधी दिली. गंभीरनेही पाचव्या व सहाव्या चेंडूवर २ खणखणीत षटकार खेचर बुमराला दबावात आणले. वेगवान गोलंदाजांची झालेली ही धुलाई रोहितला पहावली नाही व त्याने शेवटी कृणाल पांड्याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. कृणालने आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पाचव्या षटकात दोन गाडी बाद करीत कोलकाताच्या बॅकफूटवर आणले. त्याने गंभीरला १९ तर रॉबिन उथप्पाला ४ धावांत तंबूत धाडले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मनीष पांडेने सलामीवीर ख्रिस लिनच्या साथीने पॉवरप्ले पर्यंत संयमी खेळी करीत जवळजवळ १० च्या सरासरीने संघाला ५९ धावांवर आणून ठेवले. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी, विशेषतः रात्रीच्या सामान्यांसाठी पूरक असल्याने कोलकाताच्या फलंदाजांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. पहिल्या षटकात १५ धावा खाल्लेल्या बुमराला आठव्या षटकात पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले आणि त्याने विस्फोटक लिनला पायचीत पकडले. त्याने २४ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ३२ धावा केल्या. यावेळेस कोलकाताच्या धावसंख्या ३ बाद ६७ अशी होती. मागचा सामना मुकलेल्या हरभजन सिंगने नवव्या षटकात आपली गोलंदाजी सुरु केली आणि पहिल्या षटकात ५ धावा देत पाहुण्यांना काहीशे दबावात आणले. मुंबईच्या स्पिनर्सनी अचूक व टिच्चून गोलंदाजी करीत तब्बल ३५ चेंडूत एकही चौकार-षटकार दिला नाही. बाराव्या षटकात कृणालने पुन्हा एकदा आपली स्पिनची जादू चालवीत युसूफ पठाणला आपला भाऊ हार्दिककरवी झेलबाद करीत के. के. आरला चांगलेच अडचणीत आणले. त्यानंतर पाचव्या गड्यासाठी मुंबईकर सूर्यकुमार यादवने मनीष पांडेसह २७ चेंडूत ४४ धावा जमावल्या. कोलकाताच्या डावातील ही सर्वोत्तम भागीदारी होती. यादव मलिंगाच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात मिड-ऑनला पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला. त्याने २ चौकारांसह १५ चेंडूत १७ धावा केल्या. एकीकडे ठराविक अंतराने गडी  बाद होत असतानाच मनीष पांडेने एका बाजूने किल्ला लढवीत आपले ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मनीष पांडेने शेवटच्या दोन षटकांत जास्तीत जास्त स्ट्राईक घेत चांगल्याच धाव कुटल्या. शेवटच्या षटकात तर मॅकग्लेघनाला २३ धावा कुटल्या. यात मनीष पांडेने २ चौकार व दोन षटकार लगावले. पांडेच्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर कोलकाताने २० षटकांत ७ गडी बाद १७८ धावा केल्या. पांडेने ५ चौकार व तितकेच उत्तुंग षटकार खेचले. मुंबईकडून कृणाल पांड्याने ३, मलिंगाने २ तर बुमरा-मॅकग्लेघनने १ बळी टिपला. घराच्या मैदानावर के. के. आर. विरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेल्या मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांत पद्धतशीर फलंदाजी करीत पार्थिव पटेल व जोस बटलरने बिनबाद ४९ धावा केल्या. बटलरने मिळाल्या खराब चेंडूंना सीमारेषे बाहेर धाडत उपस्थित मुंबईकर प्रेक्षकांना मनोरंजित केले. चांगल्या सुरात दिसणाऱ्या पार्थिव पटेलला कोणाचीही तरी नजर लागली आणि ‘चायनामॅन’ कुलदीप यादवला आठव्या षटकात एक षटकार खेचून पुढच्याच चेंडूवर बाद झाला. पुढच्याच षटकात पंचांचा खराव निर्णय मुंबईला महाड पडला. जोस बटलरला अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंचानी पायचीत दिला. बटलरने २२  चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २८ धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्माही पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा शिकार बनला. बॅटचा कडा घेतला असतानाही पंचांनी त्याला सुनील नरेनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद दिले. तो केवळ ६ चेंडूत २ धावा करू शकला. दहाव्या षटकात मुंबईची अवस्था ३ बाद ७४ अशी झाली असताना युवा नितीश राणा व कृणाल पांड्या यांनी पटापट २३ धावा केल्या परंतु लेग साईडचा चेंडू मारण्याच्या नादात कृणाल किपर उथप्पाकडे झेल देत बाद झाला.  अंकित राजपूतने कृणाल पांड्याला बाद करीत मुंबईची अवस्था ४ बाद ९७ अशी केली. पोलार्डने नितीश राणासह काही चिवट फलंदाजी केली परंतु पोलार्ड मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला. सातव्या क्रमांकावर आलेल्या हार्दिक पांड्याने नितीश राणासह सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि सुरेख फटकेबाजी करीत मुंबईला लक्ष्याकडे नेले. शेवटच्या तीन षटकांत मुंबईला ४९ धावांची गरज असताना हार्दिक-राणा जोडीने ट्रेंट बोल्टच्या १८ व्या षटकात १९ धावा कुटत १२ चेंडूंत ३० धावा असे समीकरण आणले. १९ व्या शतकात नितीश राणाने पहिल्या २ चेंडूंवर १० धावा ठोकत १० चेंडूंत २० वर लक्ष्य आणले. राणा ऑफ साईडला फाटका मारण्याच्या नादात पॉइंटला नरेनकरवी झेल देत बाद झाला आणि कोलकाताच्या एक छोटीशी आशा दिली. उरली सुरली कसर हार्दिक पांड्याने पूर्ण केली. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने एक मिस फिल्ड करीत चौकार दिला तर रिशी धवनने हार्दिकचा झेल सोडत मुंबईला सामना बहाल केला. मुंबईने १ चेंडू राखत ४ गड्यांनी विजया मिळवत कोलकाता नाईट रायडर्सवर आपले वर्चस्व कायम ठेवले. मुंबईचा मोसमातील हा पहिलाच विजय आहे. संक्षिप्त धावफलक: के. के. आर. १७८/७(२०) मनीष पांडे ८१(४७), लिन ३२(२४), कृणाल ३-२४(४), मलिंगा २-३६(४) मुंबई इंडियन्स १८०/६(१९.५) नितीश राणा ५०(२९), पार्थिव पटेल ३०(२७), अंकित राजपूत ३-३७(४), सुनील नरेन १-२२(४) मुंबई ४ गडी व १ चेंडू राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *