लोकशाही दिनात 24 तक्रारींचा निपटारा मुंबई : पुणे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन या अवैध धंद्यांचा बिमोड करा. ज्याठिकाणी वारंवार कारवाई करुनही पुन्हा अवैधरित्या धंदे सुरु असतील ते करणाऱ्यांवर तडीपारीसारखी प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित लोकशाही दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या दरम्यान एका नागरिकाने पुणे जिल्ह्यातील वाणळेकरवाडी परिसरातील तक्रार मांडली असता मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले. लोकशाही दिनात २४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यामध्ये राज्यातील अमरावती, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, बीड, लातूर, अकोला, नागपूर, भंडारा आणि मुंबई उपनगर येथील तक्रारी होत्या. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी.एस. मीना, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुख्यमंत्र्याचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. साभार: महान्यूज]]>