पुणे – विवेकवादाची भाषा करणाऱ्या आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा पायदळी तुडवण्याचा ठेका घेतलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांच्याकडून सातत्याने अंनिसच्या न्यासामधील आर्थिक गौडबंगालाचे सूत्र उपस्थित केले जात होते. केवळ आरोप नाही, तर त्या संदर्भात विविध शासकीय खात्यांमध्ये रीतसर तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यांपैकी ४ तक्रारदारांच्या तक्रारींच्या संदर्भात सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवाल सादर करून अंनिसच्या न्यासामधील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासावर प्रशासक नेमावा, त्याचे विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्याने पुन्हा फेरचौकशी करावी, असे गंभीर ताशेरेही ओढले आहेत. यातून अंनिस आणि दाभोलकर यांचा भोंदूपणा उघडा पडला असून कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळे करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमावा, तसेच दाभोलकरांच्या हत्येशी त्यांच्या न्यासामधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण करावे, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केली. अंनिसचा अविवेकी आणि भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी १ ऑक्टोबर या दिवशी येथील श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. वर्तक बोलत होते.]]>