पिछाडीवरून पुणे सिटीचा जबरदस्त विजय, अनिबालच्या दोन गोलांच्या बळावर दिल्ली डायनॅमोजला पराभवाचा धक्का

पुणे, दिनांक 18 नोव्हेंबर 2016: तब्बल सात गोल झालेल्या रंगतदार आणि गतिमान सामन्यात एफसी पुणे सिटीने अग्रस्थानावरील दिल्ली डायनॅमोज संघाला हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी धक्का दिला. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमानांनी पिछाडीवरून उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारत 4-3 अशा फरकाने विजय साकारला. पूर्वार्धातील खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना पिछाडीवर पडलेल्या पुणे सिटीने उत्तरार्धात धारदार खेळ करून विजयाची पूर्ण तीन गुण प्राप्त केले. मेक्‍सिकन-स्पॅनिश खेळाडू अनिबल झुर्दो रॉड्रिगेझ याच्या दोन गोलांमुळे पुणे सिटीची सरशी झाली. अनिबलने 55व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला, तर नंतर दुसरा गोल 63व्या मिनिटाला नोंदविला. त्याशिवाय कर्णधार महंमद सिसोको याने 62व्या मिनिटाला गोल नोंदवून पूर्वार्धात गमावलेल्या पेनल्टी फटक्‍याची भरपाई केली. केन लुईसने 44व्या मिनिटाला दिल्ली डायनॅमोजला आघाडीवर नेले होते. एदुआर्दो फरेरा याच्या स्वयंगोलमुळे 79व्या मिनिटाला दिल्लीची पिछाडी एका गोलने कमी झाली. नंतर सहा मिनिटांच्या इंज्युरी टाईममध्ये आणखी दोन गोल झाल्यामुळे रंगत वाढली. लेनी रॉड्रिग्जने पुणे सिटीसाठी गोल केल्यानंतर, माल्साव्मझुआला याने दिल्लीची पिछाडी 4-3 अशी केली. खेळ संपण्यास अवघे मिनिट बाकी असताना दिल्ली डायनॅमोजला बरोबरीची छान संधी होती, परंतु गोलरिंगणाच्या मुखावरून मिळालेल्या फ्रीकिक फटक्‍यावर दिल्लीचा ब्रुनो पेलिसारी चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. दिल्लीला आज पराभव पत्करूनही अग्रस्थान कायम राखता आले. त्यांचा हा 11 लढतीतील दुसराच पराभव ठरला. त्यांचे 17 गुण कायम राहिले आहेत. पुणे सिटी आजच्या तीन गुणांमुळे गुणतक्‍त्यात सहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. 11 लढतीतील चौथ्या विजयामुळे त्यांचे 15 गुण झाले असून उपांत्य फेरीच्या आशाही कायम राहिल्या आहेत. मागील पाच सामन्यांत अपराजित राहिलेल्या दिल्लीचा आज पहिला पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघांची आजच्या लढतीत गतिमान सुरवात केली, परंतु सदोष नेमबाजीचे चित्र पाहायला मिळाले. यजमान संघाला आघाडीवर नेण्याची तिसऱ्याच मिनिटाला सिसोको याच्या पासवर एदुआर्दो फरेरा याला फक्त प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवायचे होते, परंतु सोराम पोईरेई याने अप्रतिम गोलरक्षण करून यजमानांना आघाडी नाकारली. त्यानंतर 25व्या मिनिटाला पुणे सिटी संघ पुन्हा गोल करण्यापासून दूर राहिला. दिल्लीच्या लालछाव्नकिमा याने गोलरिंगणात अनिबाल याला पाडले, त्यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्‍यावर चेंडूला दिशा दाखविण्यासाठी स्वतः कर्णधार सिसोको सज्ज झाला, पण गोलरक्षक सोमार याने झेपावत चेंडूला गोलजाळीत जाण्यापासून रोखले.विश्रांतीला फक्त एक मिनिट बाकी असताना केन लुईसने गोलबरोबरीची कोंडी फोडली. एमरसन मौरा याच्या “असिस्ट’वर लुईसने जबरदस्त फटक्‍यासमोर गोलरक्षक अपौला इदेल बेटे याला असाह्य ठरविले. पूर्वार्धाच्या शेवटच्या मिनिटाला सोराम याने दक्ष कामगिरीची मालिका कायम राखताना पुणे सिटीच्या मोमार न्दोये याला गोल करण्यापासून रोखले होते. अंतोनिओ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील पुणे सिटीने उत्तरार्धात खेळाची गती वाढविली. त्याचे फळ त्यांना लगेच मिळाले. विश्रांतीनंतरच्या दहाव्या मिनिटास अनिबलने बरोबरीचा गोल नोंदविला. जोनाथन लुका याच्या “असिस्ट’वर हा गोल झाला. लुकाच्या फ्रीकिक फटक्‍यावर अनिबलने चेंडूवर ताबा मिळवत शानदार हेडरवर गोलरक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली. त्यानंतर पुणे सिटीने मागे वळून पाहिलेच नाही. नंतर दोन मिनिटांत आणखी दोन गोल नोंदवत त्यांनी दिल्लीचा संघ मुसंडी मारणार नाही याची दक्षता घेतली. 62व्या मिनिटाला सिसोकोने संघाला आघाडी मिळवून दिली. लुका याने दिलेल्या पासवर सिसोको याला चेंडूचा ताबा मिळाला. यावेळी त्याने मागील चूक न करता अचूक नेमबाजी केली. पुढच्याच मिनिटाला अनिबलने सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदविला. यावेळी दिल्लीच्या बचावातील चुकीचा यजमान संघाला मिळाला. गोलरक्षक सोरामने सहकारी रूबेन रोचा याला चेंडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ही चाल असफल ठरली. त्याचा लाभ उठवत अनिबलने सणसणीत फटक्‍यावर संघाचा सामन्यातील तिसरा गोल नोंदविला. डेव्हिड ऍडीच्या क्रॉस पासवर चेंडू पुणे सिटीच्या एदुआर्दो फरेराला चाटून गोलजाळीत गेला आणि दिल्लीची पिछाडी 2-3 अशी कमी झाली. सहा मिनिटांच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. पुणे सिटीच्या जोनाथन लुकाने प्रतिस्पर्धी बचावपटू रूबेन रोचा याला चकवून दिलेल्या पासवर लेनीने चेंडूला गोलजाळी दाखविताना अजिबात चूक केली नाही. लगेच दिल्लीने आणखी एक गोल केला. मलुडाच्या पासवर माल्सावमझुआला याने संघाच्या खाती गोलची भर टाकली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *