"सुपर सब" अनिबालच्या गोलमुळे पुणे सिटीला गुण गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला घरच्या मैदानावर गोलबरोबरीत रोखले

पुणे, दिनांक 23 ऑक्‍टोबर 2016: सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना “सुपर सब” अनिबाल रॉड्रिग्जने नोंदविलेल्या फ्रीकिक गोलवर हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी एफसी पुणे सिटीने गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेला हा सामना रंगतदार आणि आक्रमकही ठरला. मेक्‍सिकोचा अनिबाल सामन्याच्या 80व्या मिनिटास बदली खेळाडूच्या रूपात मैदानात उतरला होता, लगेच दोन मिनिटांनी 82व्या मिनिटास त्याने पुणे सिटीला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 28व्या मिनिटाला जेजे लालपेखलुआ याने नोंदविलेल्या गोलमुळे चेन्नईयीन एफसी संघ पूर्वार्धाचा खेळ संपला तेव्हा एका गोलने आघाडीवर होता. सामन्यात रेफरींनी एकूण सहा खेळाडूंना यलो कार्ड दाखविली. पुणे सिटीची ही घरच्या मैदानावरील सलग दुसरी बरोबरी ठरली. अगोदरच्या लढतीत त्यांनी केरळा ब्लास्टर्सला रोखले होते. त्यांचे पाच सामन्यांतून पाच गुण झाले आहेत. ते सहाव्या क्रमांकावर आहेत. बरोबरीच्या एका गुणामुळे अव्वल स्थानी येण्याची चेन्नईयीनची संधी हुकली. त्यांचे पाच सामन्यांतून आठ गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उत्तरार्धात 75व्या मिनिटास पुणे सिटीच्या धर्मराज रावणन याने चेन्नईयीनच्या दुदू ओमागबेमीस लाथाडले, परंतु रेफरींच्या “बुक’मध्ये स्थान न मिळाल्यामुळे पुणे सिटीचा खेळाडू सुदैवीच ठरला. उत्तरार्धात वारंवार बरोबरीसाठी प्रयत्न केल्यानंतर पुणे सिटीला सामन्याची आठ मिनिटे असताना अखेरीस बरोबरी साधता आला. अनिबाल रॉड्रिगेझच्या गोलमुळे यजमान संघाने प्रतिस्पर्ध्यांची आघाडी भेदली. मेक्‍सिकोच्या स्ट्रायकरने चार सामन्यांचे निलंबन संपवून प्रथमच पुणे सिटीच्या “डग आऊट’मध्ये आलेले प्रशिक्षक अंतोनियो हबास यांना जल्लोषाची संधी दिली. अनिबाल याने तोलूनमापून मारलेल्या फ्रीकिकवर चेंडूला बचावफळीच्या भिंतीवरून गोलजाळीची दिशा दाखविली. यावेळी गोलरक्षक ड्‌वेन केर याने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो विफल ठरला. जेजे लालपेखलुआ याने 28व्या मिनिटास चेन्नईयीनला आघाडीवर नेले. जेरी लालरिनझुआला याने दूरवरून दिलेल्या पासवर जेजे याने चेंडू नियंत्रित केला. नंतर त्याने पुणे सिटीच्या एदुआर्दो फरेरा याचा बचाव भेदत नंतर गोलरक्षक अपौला इदेल बेटे यालाही गुंगारा दिला. यावेळी पुणे सिटीच्या बचावफळीतील त्रुटी स्पष्टपणे जाणवली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. आघाडी घेण्यात पाहुण्या संघाने यश मिळविले. चेन्नईयीन एफसीने आघाडी घेतल्यानंतर यजमान संघाने बरोबरीसाठी चढाया केल्या, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भक्कम राहिला. पूर्वार्धातील पहिल्या नऊ मिनिटांच्या खेळात दोन गोल अवैध ठरले. त्यामुळे दोन्ही संघांना आघाडीपासून दूर राहावे लागले. सातव्या मिनिटास जोनाथन लुकाच्या पासवर ड्रेमेन ट्राओरे याच्या हेडरने गोलजाळीचा वेध घेतला होता, परंतु रेफरींनी हा गोल नामंजूर केला. त्यानंतर लगेच दोन मिनिटांनी चेन्नईयीन एफसीलाही धक्का बसला. यावेळी दुदू ओमागबेमीचा गोल “ऑफसाईड’ ठरला. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना पुणे सिटीला बरोबरी साधण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती, मात्र या वेळी महंमद सिसोको याच्या डाव्या पायाचा फटका व्यवस्थित बसला नाही. विश्रांतीनंतर लगेच चौथ्या मिनिटाला चेन्नईयीन एफसीला आघाडी फुगविण्याची संधी प्राप्त झाली होती. जयेश राणेने उजव्या बगलेत घेतलेल्या कॉर्नर किकवर चेंडू पुणे सिटीच्या बचावपटूने रोखल्यानंतर चेन्नईयीनच्या दुदू ओमागबेमी याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने ताकदवान फटका मारला, मात्र गोलरक्षक बेटे याने हा फटका टोलवला, त्याचवेळी चेंडूचा ताबा चेन्नईयीनच्या हॅन्स म्युल्डर याच्याकडे गेला असता त्याचा हेडर कमकुवत ठरला. उत्तरार्धात पुणे सिटीच्या ट्राओरे याने चेन्नईयीनचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. 59व्या मिनिटाला अराटा इझुमी याच्या पासवर ट्राओरे याने छातीवर चेंडू नियंत्रित केला, नंतर मारलेला फटका दिशाहीन ठरल्यामुळे पुणे सिटीला लाभ झाला नाही. 62व्या मिनिटाला पुन्हा ट्राओरे याने नशीब अजमावले, परंतु फटका अगदी थोडक्‍यात हुकला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *