जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक – केंद्रीय मंत्री अनंत गीते

अलिबाग : जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, त्यासाठी आवश्यक असणारा निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी केले. नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या लोहारमाळ ते तुर्भे या पुलाचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश महेता उपस्थित होते. श्री. गीते म्हणाले की, नाबार्ड योजनेतून हा पुल मंजूर झाला. हा पुल वाहतुकीसाठी खुला झाल्याने येथील जनतेला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने विकास पर्व साजरा करत आहोत. दोन वर्षात केलेली जनहिताची कामे थेट जनतेपर्यंत पोहचवावी असे केंद्र सरकारचे धोरण आहे. जनतेच्या योजना आणल्या जातात. त्या योजना जनतेला माहिती असणे आवश्यक आहे. कोकणात जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल पोलादपूर सारख्या दुर्गम तालुक्यातील जनतेची कामे जलद गतीने केली जातील. प्रत्येक ग्रामपंचायतीला केंद्राकडून 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री प्रकाश महेता म्हणाले की, गतिमान कार्य लोकांपर्यत पोहचले पाहिजे. त्याचेच हे उदाहरण असून हा पुल जनतेला नक्कीच लाभदायी ठरेल. “मेक इन इंडिया”, “मेक इन महाराष्ट्र”, “अच्छे दिन” सध्या केंद्र सरकारने देशात गेली दोन वर्षात सर्वसामान्य माणसापर्यंत हा कार्यक्रम सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जिद्द, चिकाटी आणि वचनपूर्ती पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. राज्य सरकार दुर्गम भागातील खेडे व वाड्यात, ग्रामीण भागात अनेक योजना नेण्याचे काम करत आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे यावेळी अभिनंदन केले. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आमदार भरतशेठ गोगावले, पोलादपूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार, लोहारचे सरपंच प्रदिप सुर्वे, तुर्भेचे सरपंच गणेश उतेकर व अन्य ग्रामपंचायतीचे सरपंच, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साभार: महान्यूज]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *