मुद्रीत माध्यमे कायम टिकून राहतील – माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे

अलिबाग : प्रसार माध्यमांमध्ये बदल होत आहेत. नवनवीन प्रसार माध्यमे जन माणसांवर तसेच प्रसार माध्यमांवर परिणाम करीत आहेत, असे असले तरी मुद्रीत माध्यमे कायम टिकून राहतील, असा विश्वास कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे व्यक्त केला. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, दै.पुढारीचे रायगड आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सल्लागार सखाराम पवार, संचालक राजेश खेडेकर, परिषद प्रतिनिधी मदन हणमंते, जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले की, माध्यम क्षेत्रात काम करीत असताना माध्यम क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा अनुभव घेता आला. अलिकडच्या काळात बातम्या अधिक वेगाने मिळण्यासाठी विविध प्रसार माध्यमांबरोबर नवीन ॲपलिकेशन येत आहेत. याचा मुद्रीत माध्यमे व इलेक्ट्रॉनिक माध्यमे यावर काय परिणाम होईल या बाबतची गांर्भीयाने चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवरही मुद्रीत माध्यमे टिकून राहतील व आपला प्रभावही टिकवून ठेवतील. पत्रकारांनी नेहमीच आपली नाळ वाचकांशी जोडली पाहिजे. शासनाच्या जन कल्याणाच्या योजना सामान्य माणासापर्यंत पोहोचविण्याचे काम रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी नेहमीच केले आहे. अशाच प्रकारचे काम त्यांनी यापुढेही करावे. शासन पत्रकारांसाठीही अनेक योजना राबवित आहे. या योजनांचाही लाभ पत्रकारांनी घ्यावा. शशिकांत सावंत म्हणाले, पत्रकार सामान्य माणसाचे पाणी, रस्ते अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम करत असतो. कोकण पुढे जात आहे, प्रगती करत आहे. यामध्येही पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृति पत्रिका सन्मानाने मिळावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकारांनी अतिशय प्रतिकुल परिस्थिती काम केले आहे. अशा ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सन्मानाने मिळाली तर त्यांच्या सेवेचा सन्मान होईल, असे मिलिंद अष्टीवकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने रायगड पत्रभूषण पुरस्कार अरुण करंबे (रोहा), रामनारायण युवा पुरस्कार लोकसत्ताचे रायगड प्रतिनिधी हर्षद कशाळकर व खोपोलीचे पत्रकार प्रवीण जाधव तसेच कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यिक कै.र.वा.दिघे पुरस्कार साहित्यिक उज्ज्वला दिघे यांना यावेळी डॉ.गणेश मुळे व शशिकांत सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रायगड जिल्ह्यात विविध पुरस्कार प्राप्त व उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकार उमाजी केळुसकर, सुवर्णा दिवेकर, बळवंत वालेकर, जयपाल पाटील, नागेश कुलकर्णी, शरद कोरडे यांचाही या प्रसंगी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अरुण करंबे, हर्षद कशाळकर, उज्ज्वला दिघे, प्रवीण जाधव यांनी मनोगत व्यक्त करून रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन मदन हणमंते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले. प्रारंभी साप्ताहिक कुलाबा वैभवचे संपादक बळवंत वालेकर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले. साभार: महान्यूज]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *