पोलार्डने घालवली कोहली, बद्रीची मेहनत वाया, मुंबई इंडियन्सने केला अशक्य विजय शक्य

विराट कोहलीचे पुनरागमनात अर्धशतक, सॅम्युएल बद्रीची हॅट-ट्रिक ठरली आजच्या सामन्याची वैशिष्टये. पोलार्ड-कृणाल जोडीने सहाव्या गड्यासाठी रचलेली महत्वपूर्ण ९३ धावांची भागीदारी मुंबईच्या विजयासाठी पोषक ठरली. बंगळुरू: सगळ्यांच्या नजारा ज्याच्यावर टिकून असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रात शानदार सुरुवात करून तमाम चाहत्यांना खुश केले खरे परंतु फॉर्मात आलेल्या मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला त्यांच्याच घराच्या मैदानावर एक अशक्य असा विजय साजरा करीत यंदाच्या सत्रात ‘टॉप’ला पोचण्याचा पराक्रम केला. पुण्याविरुद्ध पहिला सामना गमावणाऱ्या मुंबईने दमदार कमबॅक करीत सलग तीन सामने जिंकले आहेत. कोहली-गेलची सावध सुरुवात जवळपास महिनाभर खांद्याच्या दुखापतीमुळे खेळापासून दूर राहिलेल्या विराट कोहलीने आज आपल्या संघासाठी पुनरागमन करीत विस्फोटक ख्रिस गेलसह सामन्याची सुरुवात केली. नेहमीपेक्षा काहीशी कोरडी असलेल्या चिन्नस्वामीच्या खेळपट्टीवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहलीने तिसऱ्याच षटकात टीम साऊथीला एक षटकार खेचत आपण पूर्णपणे बरा झाल्याचे संकेत दिले. गेलही मागच्या सत्रापासून आय. पी. एल. मध्ये फॉर्मसाठी झगडत असताना आज काहीसा सावध पवित्रा घेत असताना दिसला. नेहमीच चौकार-षटकारांची अपेक्षा असलेल्या गेलने आज २७ चेंडूंत केवळ २२ धावाच केल्या. यात त्याने २ चौकार व १ षटकार खेचला. साऊथीच्या त्या षटकात १७ धावांचा अपवाद वगळता कोहली-गेल जोडीला मुंबईच्या खडूस गोलंदाजांनी चांगलेच पकडून ठेवले. दहाव्या षटकात गेल बाद होण्यापूर्वी हरभजन सिंगने त्याच्या ४ षटकांत केवळ २३ दिल्या तर मिचेल मॅकग्लेघन, जसप्रीत बुमरा यांनीही टिच्चून गोलंदाजी करीत हरभजनला चांगलीच साथ दिली. कृणाल पांड्या वि. ए. बी. डिवीलियर्स किंग्स XI पंजाबविरुद्ध संघात परतलेल्या डिवीलियर्सने गेलच्या बाद झाल्यानंतर विराट कोहलीसोबत सामन्याची सूत्रे हाती घेतली. ६३ धावांच्या सलामी भागीदारीने कोहली-डिवीलियर्सनेही ३१ चेंडूत ४७ धावांची दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी रचत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १४ व्या षटकात जसप्रीत बुमराला १९ धावा ठोकत या जोडीने तसे संकेतच दिले. यात लॉंग-ऑफला एक कोहलीचा षटकारही सामील होता ज्यात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. एकीकडे काही प्रमाणात धावा रोखण्यात यश आलेल्या मुंबईच्या गोलंदाजांना या दोन स्पेशालिस्ट खेळांडूंनी काहीशे चोपुनही काढले. १६ व्या षटकात मॅकग्लेघनने कोहलीला बाद करीत एक चांगली दिसणारी भागीदारी फोडली तर कृणाल पांड्यानें पुढच्याच षटकात डिवीलियर्सला रोहित शर्माकरवी झेलबाद करीत बंगलोरला तिसरा धक्का दिला. कृणालने आय. पी. एल. मध्ये आतापर्यंत तीन डावांत तिन्हीवेळा बाद करण्याची किमया केली. कोहली, डिवीलियर्स बाद झाल्यानंतर बंगलोरचा डाव काहीसा गडगडला. रॉयल चॅलेंजर्सच्या डावातील एक अजब बाब म्हणजे त्यांच्या एकही खेळाडूला शेवटच्या ३२ चेंडूंत एकदाही चेंडू सीमारेषा पलीकडे धाडता आला नाही. आणि त्याहून अजब बाब म्हणजे त्यांचे ४-५ नव्हे तर ९ खेळाडू शिल्लक होते. २० षटकांत रॉयल चॅलेंजर्स ५ गडी गमावत कसाबसा १४५ धावांचा पल्ला गाठू शकला. मुंबईचा फ्लॉप शो आणि बद्रीची हॅट-ट्रिक १४३ धावांचं माफक आव्हान पेलण्यास उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच विचित्र झाली. कोहलीनेही बद्री करवी गोलंदाजीची सुरुवात केली आणि मुंबईला पहिल्याच षटकापासून दबावात आणण्यास सुरुवात केली. ज्या प्रकारे मुंबईने आपले अस्त्र वापरले तसेच कोहलीनेही चाल खेळात स्टुअर्ट बिन्नीला दुसरे षटक दिले. बिन्नीनेही आपल्या कर्णधाराला नाराज न करता पाचव्या चेंडूत जोस बटलरला (५ चेंडूंत २ धावा) बाद करीत मुंबईचा डाव फोडण्यास सुरुवात केली. लगेच तिसऱ्या षटकात बद्रीने पार्थिव पटेल (८ चेंडू ३ धावा), मीचेल मॅकग्लेघन (१ चेंडू ० धाव) व फॉर्मसाठी झगडणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा (२ चेंडू ० धाव) यांना अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर बाद करीत यंदाच्या मोसमातील हॅट-ट्रिक साधली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून आपला पहिला सामना खेळणाऱ्या बद्रीने त्यांच्या संघासाठी पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रंगीत तालीम असलेल्या या स्पर्धेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना आपला फॉर्म सिद्ध करण्यासाठी यंदाच्या या मोसमात विशेष कामगिरी करून निवड समितीकडे लक्ष वेधण्याचा ही एक संधीच आहे असे म्हणावे लागेल. परंतु रोहित शर्मासाठी परिस्थिती काही ठीक दिसत नाही. मंदीच्या दुखापतीपासून जवळपास ५ महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रोहितने एकूण खेळलेल्या ६ सामन्यांत केवळ २९ धावा केल्या आहेत. त्यात यंदाच्या आय. पी. एल. मध्ये ४ डावांत केवळ ९ धावांचं योगदान आहे. त्याचा हा फॉर्म त्याच्यासाठी व टीम इंडियासाठी एक चिंतेचा विषय ठरू शकेल. पोलार्ड-कृणालची चिकाटी भागीदारी ७ धावांत ४ गडी गमावलेल्या मुंबई इंडियन्ससाठी नितीश राणा आजची काही विशेष कामगिरी करेल असे वाटले होते. परंतु बद्रीने आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अरविंदकरवी त्यालाही झेलबाद करीत मुंबईला आणखी अडचणीत आणले. आघाडीचे पाच फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मुंबई हा सामना गमावले असेच चित्र दिसत होते. अगदी नवव्या खेळाडूपर्यंत तगडी फलंदाजी असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी या वेळी धावून आले ते पोलार्ड-कृणाल. कोलकाता विरुद्ध चुकीचा फटका मारून बाद झाल्यानंतर संजय मांजरेकरने ‘ब्रेनलेस’ असे म्हटलेल्या पोलार्डने आज महत्वाच्या क्षणी आपल्या संयमी खेळीचे प्रदर्शन केले. एरव्ही चौकार-षटकार मारणाऱ्या पोलार्डने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि कृणाल पांड्याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी जवळपास १० षटके खेळून काढून ९३ धावांची भागीदारी रचली. हीच भागीदारी मुंबईच्या विजयासाठी पोषक ठरली. अठराव्या षटकात चहलने पोलार्डचा अडथळा दूर केला खरा परंतु त्याने ४७ चेंडूंत ३ चौकार व ५ उत्तुंग षटकार खेचत ७० धावा केल्या. कृणालनेही नाबाद ३७ (३० चेंडू) धावा करीत मुंबईला विजयश्री खेचुन आणले. मागील तीन सामन्यात मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे. मुंबई इंडियन्स याच विजयाबरोबर गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान झाली असून त्यांचा पुढील सामना घराच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर रविवारी गुजरात लायन्सबरोबर असेल. संक्षिप्त धावफलक रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: १४२/५(२०) कोहली ६२(४७), गेल २२(२७), मॅकग्लेघन २-२०(४), हार्दिक पांड्या १-९(२) मुंबई इंडियन्स: पोलार्ड ७०(४७), कृणाल ३०(३७), बद्री ४-९(४), बिन्नी १-१४(२) मुबंई इंडियन्स ४ गडी व ७ चेंडू राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *