पेलाग्रा आजार (कुपोषणाचे बळी)

खालील फोटो पाहिलत का? मागच्या एक आठवड्यात माझ्याकडे या प्रकारचे चार पाच रुग्ण आले आणि नेहमीच येत असतात. हे सगळे रुग्ण आहेत दुष्काळी भागातले आणि गरीब कुटुंबातले.यांना झालेल्या आजाराचं नाव आहे पेलाग्रा (pellagra). आहारात niacin (nicotinamide) किंवा ज्याला आपण व्हिटॅमिन बी ३ म्हणतो, त्याची कमतरता आली की, हा आजार होतो. कुपोषणामुळे होणारा हा आजार प्राणघातक असतो हे मी आधीच सांगून ठेवतो. या आजाराचं स्वरूप ‘4D’ या पद्धतीनं वर्णन केलं जातं. Dermatitis, Dirrhoea, Dementia and Death. मराठीत सांगायचं तर चर्मरोग, हगवण, मेंदूचा आजार आणि शेवटी मृत्यू.   मी या रुग्णांना त्यांच्या आहाराविषयी विचारतो, तेव्हा त्यांचा आहार हा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे असं मला जाणवतं. मका, ज्वारी आणि तशीच तृणधान्ये हाच त्यांचा आहार. “जेवणात भाजीपाला, दूध किंवा कडधान्ये घेत नाही का?” असं मी विचारतो तेव्हा हे रुग्ण विषण्ण हसतात आणि म्हणतात, “भाजीपाला? साहेब, आमच्या गावात प्यायला पाणी नाही आणि भाजीपाला कुठनं पिकवणार?””डाळी किंवा दूध?””दूध ‘च्या’तनं जात असेल तेवढं. डाळ असते की आमटीत.””आठवड्याला किती डाळ वापरता?””किती म्हंजे, एका टायमाला अर्धा पसा.””पण तेवढ्याने काय होणार? उसळ वगैरे करत नाही घरी?””एवढी मिजास परवडते होय आम्हांसनी? नुसतं चटणी मीठ टाकून आमटी करता येत नाही म्हणून डाळ घालायची, न्हायतर तेवढीही परवडत नाही आम्हांला.””मग भाकरी कशासंगट खाता? कोरड्यास कशाचं?””जुंधळ्याची आंबील आणि कण्या. नाहीतर आमटी.”ऐकून माझ्या डोळ्यांपुढं त्या लोकांचं जेवण दिसू लागतं. एक जर्मनची ताटली, त्यात मक्याच्या किंवा भाकरीची चवड, वाटीत ज्वारीच्या पीठाची आंबील, दुसऱ्या वाटीत तळाला चारदोन डाळी असलेली पाण्यासारखी पातळ आमटी, भाताच्या जागी मक्याच्या किंवा ज्वारीच्या कण्या. दूध नाही, भाजीपाला नाही, उसळ नाही, घट्ट वरण नाही, भात नाही, चपाती नाही, तेल नाही; लोक वर्षानुवर्षे हेच खाऊन जगताहेत. आहारात प्रथिनं, मेद, जीवनसत्त्वे यांचा लवलेशही नाही…. आणि हे असं काही असतं हे त्यांच्या गावीही नाही.एकीकडे मी लाखो करोडोंच्या गोष्टी ऐकतो पाहतो आणि त्याचवेळी कुपोषणाने जाणारे असे शेकडो बळी पाहतो. आपला देश सुधारलाय, तो आता जागतिक महासत्ता बनणार असं म्हणत असताना खेड्यापाड्यातले शेकडो लोक आज असे कुपोषणाने बळी पडताहेत ही खरंच आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.  या लोकांना मागे सोडून आपण प्रगती नाही करू शकत. हा देश महासत्ता बनो किंवा न बनो पण देशातल्या गोरगरीब जनतेला रोज पेंढीभर भाजी, मूठभर कडधान्ये आणि कपभर दूध मिळायलाच हवं… आणि स्वतंत्र भारतात तो त्यांचा अधिकार असावा. वर दिलेले फोटो पाहिले की तुमच्या लक्षात येईल की फोटोतले सर्व रुग्ण अतिशय गरीब आहेत. लोकांना पोटभर अन्न मिळू नये आणि सकस अन्नाविना लोक मरावेत ही गोष्ट नेहमीच माझं काळीज पोखरत असते.मी या रुग्णांना बरे करतो आणि जाताना सांगतो की बाबांनो, तुम्ही असे आजार झाल्यावर दवाखान्याला जेवढे पैसे घालता तेवढे पैसे डाळभाजीवर खर्च केलेत तरी पुरेसं आहे, पण हे मी कुणाकुणाला सांगणार! सगळेच लोक माझ्याकडे येत नाहीत ना हो!…
©डॉ.अशोक माळी, मिरज.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *