निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश

सोलापूर प्रतिनिधी (श्रीकृष्ण देशपांडे) :- नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा शासकीय अद्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असे ते म्हणाले . 
वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. ४ एप्रिल २००७ रोजी राज्याच्या मंत्रीमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९  मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला . हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता सम्मती दिली होती. ३ एप्रिल २०१७ ला हा करार संपल्या नंतरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपुर तालुक्यांना मिळावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली. 
जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहिर केला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा – देवघर या  धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना १०० टक्के होणार आहे .

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *