सलामी जोडी, पांड्या शोने भारत विजयी, मालिका ३-० ने खिशात

इंदोर: मागच्या सामन्यातील विजयासह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या भारताने आजही आपला दाखवत पाहुण्या कांगारूंना पाच गड्यांनी लोळवत पाच सामान्यांच्या मालीकेत ३-० अशी आघाडी घेतली आणि मालिका आपल्या खिशात घातली. याच विजयाबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वात सलग नऊ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आणि सलग सहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २९४ धावांचा पाठलाग भारताने पाच गडी व १३ चेंडू राखत केला. इंदोरच्या सपाट खेळपट्टीवर जेथे ३५० धावा सहजरित्या होतात, भारताने ऑस्ट्रेलियाला २९३ धावांत रोखले. भारताने मुंबईकर सलामी जोडीवर विश्वास दाखवत डावाची सुरुवात केली. अजिंक्य रहाणे – रोहित शर्मा या जोडीने आक्रमक सुरुवात करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. पॅट कमिन्स, कुल्टर-नाइल या वेगवान गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत दहाव्या षटकात भारताला बिनबाद ६८ अशी आक्रमक सुरुवात करून दिली. यात  मारलेला एक चेंडू तर थेट मैदानाच्या बाहेर गेला. पंधराव्या षटकात या मुंबईकर जोडीने भारताला शंभरी गाठून दिली. तेराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अगरच्या चेंडूवर पुढे जाऊन एक जोरदार षटकार खेचत ४२ चेंडूंत आपले ३३वे अर्धशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर रोहितने फिरकीचाही तितकाच चांगला समाचार घेतला. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या रहाणेनेही आपला खेळ दाखवत १८व्या षटकात कुल्टर-नाइलला चौकार खेचत आपले २१ वे अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी मैदानात स्थिर झाली असे वाटत असताना रोहित शर्मा ऑफ स्टम्पला एक आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याच्या नादात डिप मिड-विकेटला झेल देत बाद झाला. त्याने ६२ चेंडूंचा सामना करीत सहा चौकार व चार षटकार खेचत ७१ धावा केल्या. राहाणेही (७०) लगेच बाद होत भारताची अवस्था २४ व्या षटकात दोन बाद १४७ अशी झाली. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंड्याची वर्णी लागली. हार्दिकने विराट कोहलीसह पुढील सूत्रे हाती घेतली. हार्दिकने आपला नैसर्गिक खेळ दाखवत ऑस्टेलियाच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला केला तर कोहलीने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने इंदोरच्या प्रेक्षकांना चांगलेच मनोरंजित केले. कोहली-पांड्या जोडीने चौथ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी रचित मौल्यवान योगदान दिले. दोनशेच्या पल्ला गाठल्यानंतर ही जोडी सहज भारताला विजय मिळवून देत असे वाटत असताना ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू टोलवण्याच्या नादात कोहली (२८) बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या केदार जाधवला रिचर्डसनने केवळ दोन धावांवर बाद करीत सामन्यात वेगळेच वळण आणले. ऑस्ट्रेलिया सामन्यात चित्रे फिरवेल असे दिसत असताना हार्दिकने आपला प्रहार चालू ठेवला. ३९ व्या षटकात अगरच्या गोलंदाजीवर षटकार व नंतर एक धाव घेत आपले चौथे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. विजयासाठी दहा धावा शिल्लक असताना पांड्या (७८) बाद झाला. उरलेल्या धावा मनीष पांडे (३६*) व धोनी (३*) पूर्ण केल्या. तत्पूर्वी स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामान्यांतील खराब कामगिरीनंतर सलामीवीर कार्टराईटच्या जागी ऍरॉन फिंचची वर्णी लागली तर यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या जागी पीटर हॅन्ड्सकम्बला संधी भेटली. ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात करीत ७० धावांची संयमी सलामी दिली. भारताच्या सलामी गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आल्यानंतर हार्दिक पांड्याने घातक वॉर्नरला (४२) बाद करीत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. नंतर स्मिथने फिंचच्या साथीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. फिंच (१२४) व स्मिथ (६३) यांच्या तिसऱ्या गड्यासाठी झालेल्या १५४ धावांच्या भागीदारीनंतर ऑस्ट्रेलिया सहज ३५० धावांचा पल्ला गाठेल असे वाटत होते. पण अश्विन-जडेजाच्या जागी वर्णी लागलेल्या कुलदीप यादव, युजवेंद्र चहल या जोडीने नेहमीप्रमाणे विरोधी संघाला गोच्यात टाकले. आज कुलदीप थोडासा महागडा ठरला खरा पण फिंच, स्मिथचा विकेट धावा रोखण्यास उपयोगी ठरला. मोठी मोठी जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चांगलेच जखडून ठेवले. परिणामी ऑस्ट्रेलिया आपल्या निर्धारित ५० षटकांत सहा गादी गमावत केवळ २९३ धावा करू शकला. संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया २९३/६ (फिंच १३४, स्मिथ ६३, बुमराह २-५२, कुलदीप २-७५) भारत २९४/५ (हार्दिक ७८, रोहित ७१, कमिन्स २-५४, रिचर्डसन १-४५) भारत ५ गडी व १३ चेंडू राखून विजयी]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *