स्टीव ओ’किफीच्या फिरकीसमोर भारताने टाकली नांगी, दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांची आघाडी, भारताला सामन्यात राहण्यासाठी पाहुण्यांना दुसर्‍या डावात लवकर बाद करण्याचं आव्हान. पुणे: आपल्या घराच्या मैदानावर मागील काही महिन्यांपासून आपणच दादा आहोत हे सिद्ध करणाऱ्या भारतीय संघाला आज एक वेगळीच चव चाखावी लागली. मागच्या वर्षी एकही सामना न गमावणाऱ्या भारताला आज ऑस्ट्रेलियाच्या अचूक मार्‍यासमोर आज सपशेल शरणागती पत्करावी लागली. मिचेल स्टार्क व स्टीव ओ’किफीच्या गोलंदाजीवर भारतीय संघाचा फडशा पार झाला आणि भारत पहिल्या डावात अवघ्या १०५ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसर्‍या डावात चांगली फलंदाजी करीत एका मोठ्या आघाडीकडे आपले लक्ष्य केले आहे. यंदाच्या मोसमात फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघाला तह देण्यासाठी काल पहिल्या दिवशी पुरेपूर प्रयत्न केला व त्यांना यात काही अंशी यशही आलं. आज दुसर्‍या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा राहिलेला एक गडी बाद करून त्यांचा डाव २६० धावांत गुंडाळला. अश्विनने मिचेल स्टार्कला ६१ धावांवर जडेजाकरवी बाद केले आणि कालच्या शेवटच्या  झालेला नुकसान थांबवला. ऑस्ट्रेलियाला बाद करण्यासठी आज सकाळी भारताला केवळ ५ चेंडूची आवश्यकता भासली. स्टार्कला बाद करीत अश्विनने यंदाच्या मोसमात ६४ बळी मिळवत कपिल देवचा एका मोसमात ६३ बळी मिळवण्याचा विक्रमही मोडीत काढला. मागील काही वर्षांपासून सलामीच्या खेळाडूंची सतावत असलेली समस्या भारताला आजची जाणवली. डावाची सुरुवात करणाऱ्या मुरली विजयाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. एरवी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या विजयाला हेझलवूडने यष्टीरक्षक वेडकरवी बाद करीत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने लोकेश राहुलसोबत काही काळ संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला खरा पंरतु धावफलकावर ४४ धावा असताना स्टार्कने पुजाराला बाद करीत भारतीय डावाला खिंडार पडण्यास सुरुवात केली. भारताचा पूर्ण फॉर्मात असलेला विराट कोहलीही स्टार्कच्या बाहेरच्या चेंडूला कट करण्याच्या नादात वेडकडे एक सोपा झेल देऊन बाद झाला आणि भारतीय डाव आणखी अडचणीत आणला. कोहली बाद झाल्यानंतर भारतीय डावाला जणू ग्रहणच लागले. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या संघाची चांगली कामगिरी पाहण्यास आलेल्या येथील उपस्थित प्रेक्षकांची घोर निराशा झाली. ३२ वर्षीय स्टीव ओ’किफीने भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीवर अक्षरशा नाचवले. पुण्याच्या सपाट व कोरड्या खेळपट्टीवर टिच्चून गोलंदाजी करीत भारताचे तब्बल ६ गडी टिपले. भारताचे शेवटचे ७ फलंदाज तर केवळ ११ धावांत बाद झाले. भारताचा पहिला डाव केवळ १०५ धावांत आटोपला आणि कोरड्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला १५५ धावांची मोठी आघाडी मिळाली. दरम्यान भारतातर्फे सलामीवीर राहुलचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताच्या आठ फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे किफीने ३५ धावांत ६, स्टार्कने ३८ धावांत २ तर हझलवूड, लायनला प्रत्येकी एक गडी बाद करता आला. २०१० पासून कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही दुसरी निच्चांक धावसंख्या ठरली. चांगली आघाडी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात आक्रमक सुरुवात केली. विस्फोटक डेविड वॉर्नरने अश्विनच्या पहिल्याच षटकात दोन चौकार खेचत वेगळेच संकेत दिले. अश्विननेही आपल्या फिरकीची चमक दाखवत पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला पायचीत करीत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. या डावात सलामीस बढती मिळालेल्या शॉन मार्श आजची काही विशेष करण्यास अपयशी ठरला. आश्विने त्यालाही पायचीत करीत पाहुण्यांना दुसरा धक्का दिला. चहापानाला काहीच चेंडू शिल्लक असताना लेग स्लीप मध्ये उभ्या असलेल्या मुरली विजयने स्मिथचा एक सोपा झेल सोडला आणि एक चांगली संधी वाया घालवली. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया २ गडी बाद ४६ धाव करून २०१ धावांनी आघाडीवर होता. मोठ्या आघाडीकडे झेप घेत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला कमीतकमी धावसंखेत रोखणे हे भारतापुढे आव्हान होते. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्मिथने एका बाजूने किल्ला लढवत आपल्या संघाला आणखी मजबूत केले. शेवटच्या सत्रात अपेक्षेप्रमाणे भारताने गोलंदाजी केली परंतु हॅंड्सकॉम्ब व रेनशॉ यांच्याशिवाय इतर फलंदाजांना बाद करण्यात भारत अपयशी ठरला. अश्विनने हॅंड्सकॉम्बला विजयकरवी झेलबाद केले. त्याने ३४ चेंडूत ३ चौकारांसह १९ धावा केल्या. तर रेनशॉ जयंत यादवच्या गोलंदाजीवर इशांत शर्माकडे झेल देऊन बाद झाला. रेनशॉने ५० चेंडूत ५ चौकारांसह ३१ धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावाप्रमाणे याही डावात भारताचे रिव्हूचे दोन्ही दावे ३७ व्याच षटकात फेल गेले. स्मिथने आपले कसोटी कारकिर्दीतील २१ वे अर्धशतक झळकावत संघाला मोठ्या धावसंखेकडे नेले. दिवसाअखेर स्मिथ ११७ चेंडूत ७ चौकारांसह ५९ धावांवर तर मिचेल मार्श ४८ चेंडूत २ चौकार व १ उत्तुंग षटकारासह २१ धावांवर नाबाद होते. दुसर्‍या डावात आता ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांची मोठी व महत्वपूर्ण अशी आघाडी आहेत तर अजूनही त्यांचे ६ गडी बाकी आहेत.

स्पॉन्सर बोर्डच्या एल. ई. डी. जंक्शनला छोटीशी आग, अग्निशमक दलाने आणली लगेच आटोक्यात

भारताच्या डावाचे २२ वे षटक चालू असताना वेस्ट स्टॅन्ड जवळील स्पॉन्सर बोर्डच्या एल. ई. डी. जंक्शनने अचानक पेट घेतली आणि सामना काही काळ थांबवण्यात आला. अग्निशमन दलाची गाडी अगदी जवळ असल्यामुळे छोटी असलेल्या आगीवर लागेचच नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. दरम्यान स्पॉन्सर बोर्डवरील जाहिराती बंद पडल्या. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उन्हामुळे या बॉक्सने पेट घेतली व जाहिरातींचे बोर्ड बंद पडले. minor-fire-at MCA-stadium-pune-on-day-2

अश्विनने घातली कपिल देवच्या विक्रमला गवसणी

भारताचा प्रमुख फिरकीपट्टू रविचंद्रन अश्विनने मिचेल स्टार्कला बाद करीत यंदाच्या मोसमातील घराच्या मैदानावर ६४ बळी टिपण्याची किमया केली. एका मोसमात घराच्या मैदानांवर सर्वाधिक बळी घेण्याचा कपिल देवचा ३७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. कपिल देवने १९७९-८० च्या मोसमात १३ सामन्यांत ६३ बळी टिपले होते तर अश्विनने यंदाच्या मोसमात १० व्या सामन्यात ६४ बळी मिळवून हा विक्रम मोडीत काढला. संक्षिप्त धावफलक (दिवस दुसरा): ऑस्ट्रेलिया: पहिला डाव २६०/१० (९४.५) व दुसरा डाव १४३/४ (४६) भारत: पहिला डाव १०५/१० (४०.१) ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी आघाडीवर]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *