अल्फारोचा गोल नॉर्थईस्टसाठी मौल्यवान पुणे सिटीवर एका गोलने निसटता विजय, दोन्ही संघ खेळले दहा खेळाडूंसह

पुणे, दिनांक 12 ऑक्‍टोबर 2016: सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना एमिलियानो अल्फारो याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर नॉर्थईस्ट युनायटेडने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसरा विजय नोंदविला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बुधवारी झालेल्या लढतीत त्यांनी एफसी पुणे सिटी संघाला एका गोलने हरविले. पुण्यात आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्टने नोंदविलेला हा पहिलाच विजय ठरला. नॉर्थईस्ट युनायटेडचे आजच्या विजयाने नऊ गुण झाले. सामन्याच्या 79व्या मिनिटाला उरुग्वेच्या अल्फारो याने चेंडूला गोलजाळीची अचूक दिशा दाखवून नेलो व्हिंगाडा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला पूर्ण तीन गुण मिळवून दिले. या लढतीत दोन्ही संघांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. सामन्याच्या 36व्या मिनिटाला पुणे सिटीच्या निर्मल छेत्रीला थेट रेड कार्ड मिळाले, तर 71व्या मिनिटाला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे पुणे सिटीच्या एदुआर्द फरेरा याला मैदान सोडावे लागले. पुणे सिटीला आज दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचे तीन सामने खेळल्यानंतर तीन गुण कायम राहिले आहेत. सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना एमिलियानो अल्फारो याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. एफसी गोवाविरुद्ध गुवाहाटीत नॉर्थईस्टच्या विजयात दोन्ही गोल केलेल्या अल्फारोने यावेळी गोलरक्षक अपौला बेटे याचा बचाव भेदला. जपानी खेळाडू कात्सुमी युसा याच्या “असिस्ट’वर अल्फारो याने संधीचे सोने केले. निकोलस वेलेझ याने रचलेल्या पासवर चेंडू पुणे सिटीच्या महम्मद सिसोको याने रोखला, वेलेझने पुन्हा चेंडूवर ताबा मिळवत अल्फारो याला पास दिला. अल्फारो याने डाव्या बगलेत चेंडू कात्सुमी युसा याच्या स्वाधीन केला. युसा याने मारलेला ताकदवान फटका पुणे सिटीच्या खेळाडूला चाटून पुन्हा अल्फारो याच्याकडे दिला. यावेळी उरुग्वेच्या खेळाडूने स्वतःच चेंडूला अचूक दिशा दाखविली. या मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेडने तीन वर्षांत नोंदविलेला हा पहिलाच गोल ठरला. पूर्वार्धातील खेळ संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टचा एक खेळाडू कमी झाला. 36व्या मिनिटास पाहुण्या संघाच्या निर्मल छेत्री याला रेड कार्ड मिळाले. पुणे सिटीच्या अनिबल रॉड्रिगेझ याला धोकादायकरीत्या अडथळा आणणे निर्मलसाठी चांगलेच महागडे ठरले. सामन्याच्या 71व्या मिनिटास पुणे सिटीलाही एक खेळाडू गमवावा लागला. त्यांचा बचावपटू एदुआर्द फरेरा याला सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाले, त्यामुळे रेड कार्डमुळे तो मैदानाबाहेर गेला. त्याला पहिले यलो कार्ड पंधराव्या मिनिटास मिळाले होते. दुसऱ्यांदा नॉर्थईस्टच्या रोमेरिक याला अडथळा आणणे एदुआर्दसाठी नडले. सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटास नॉर्थई स्टने चांगली चाल रचली होती. कोफी ख्रिस्तियन न्द्री याने दिलेल्या शानदार क्रॉसवर एमिलियाने अल्फारो याचा हेडर पुणे सिटीचा गोलरक्षक अपौला बेटे याने वेळीच रोखला, त्याचवेळी सहाय्यक रेफरींना हा प्रयत्न ऑफसाईडही ठरविला. रोमेरिकच्या फ्रीकिकवर अल्फारो याचा हेडर गोलरक्षक बेटे याने रोखला. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटाला पुणे सिटीने संघात बदल केला. गौरमांगी सिंगची जागा अराटा इझुमी याने घेतली. आक्रमण धारदार करणे हा यामागचा मुख्य उद्देश राहिला. 53व्या मिनिटाला पुणे सिटीच्या लेनी रॉड्रिग्जने डाव्या पायाचा आक्रमक फटका मारला, पण तो गोलपट्टीवरून गेल्यामुळे नॉर्थईस्टचे नुकसान झाले नाही. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टला आघाडी फुगविण्याची संधी होती, मात्र पुणे सिटीचा गोलरक्षक बेटे याच्या दक्ष कामगिरीमुळे निकोलस वेलेझ याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. सामन्याच्या भरपाई वेळेत संजू प्रधान याचा फटका नॉथईस्टचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने रोखल्यामुळे पुणे सिटीची बरोबरी साधण्याची शेवटची संधीही वाया गेली.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *