जळगाव दि. २३(सागर कुलकर्णी) – भावी पिढीला संस्कारित करण्यासाठी मार्गदर्शक व प्रेरक ठरणाऱ्या पूज्य साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी गुरुजींचे यथायोग्य स्मारक व्हावे; यासाठी मी खान्देशवासी म्हणून जबाबदारी स्विकारत असून त्यासाठी प्रयत्नशिल आहे, अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांनी दिली. अमळनेर येथे सानेगुरुजी स्मारक साने गुरुजी कर्मभूमी स्मारक पायाभरणी समारंभ नियोजन जागेवर पाहणी करण्यासाठी ते गुरुवारी (दि.२२) आले होते. या नियोजित स्मारक समितीचे ना. रावल हे स्वागताध्यक्ष आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी गुरुवारी सायंकाळी गलवाडे रस्त्यावरील स्मारक जागेची पाहणी करुन भेट दिली. यानिमित्त सानेगुरुजी विद्यालयात आयोजित बैठकीस ना. रावल हे मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, सुभाष भांडारकर यांसह प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार प्रदीप पाटील, समन्वयक अविनाश पाटील, डॉ. ए. जी. सराफ, चेतन सोनार, भारती गाला, दर्शना पवार आदी स्मारक समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक चेतन सोनार यांनी केले. त्यानंतर स्मारक समन्वयक अविनाश पाटील यांनी माहिती विशद केली. सुत्रसंचालन सुनिल पाटील यांनी केले.]]>