जळगाव, दि. ९ – जळगाव जिल्हा हा मोठा असून या जिल्ह्याचा विकास करताना जलयुक्त शिवार अभियान, सोबतच नदी जोड प्रकल्पासारखे मागे पडलेले प्रकल्प कार्यान्वित करण्यावर आपला भर असेल. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांसोबत आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज पार पडली. नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस पालकमंत्री ना. पांडुरंग फुंडकर, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयागताई कोळी, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी. नाना पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, डॉ. सतिष पाटील, सुरेश भोळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिरिष चौधरी, किशोर पाटील, उन्मेष पाटील विधानपरिषद सदस्य गुरुमुख जगवाणी, महापौर नितीन लढा तसेच सदस्य उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या की, सन २०१५-१६ मध्ये ४२८ कोटी ४९ लक्ष ८६ हजार इतका खर्च झाला आहे. सन २०१६-१७ मध्ये सर्व साधारण योजनेत ३०५ कोटी ९९ लाख आदिवासी उपयोजनेत २५ कोटी ३४ लाख १४ हजार, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी ४७कोटी रुपये, तर विशेष घटक योजने अंतर्गत २१कोटी ६३ लाख ३० हजार असा एकूण ४५७ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये इतका नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी ३९९ कोटी ९६ लक्ष ९८ हजार रुपये तरतूद प्राप्त असून आता पर्यंत ३२ टक्के निधी खर्च झाला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत ना. फुंडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने प्रस्ताव द्या. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर भरती करण्याच्या परवानगीत जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत पाठपुरावा करु, असे संकेतही त्यांनी दिले. तसेच कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाट्या चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशा बंधाऱ्यांना सिमेंट्च्या भिंती बांधण्याबाबतही अंदाजपत्रक सादर करा, अशा सुचना ना. फुंडकर यांनी प्रशासनाला दिल्या. नदी जोड सारखा जलसंधारणाला चालना देऊन पाण्याची उपलब्धता वाढवणाऱ्या उपक्रमाबाबत विशेष बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सभागृहाला सांगितले. या बैठकीत विविध विभागनिहाय व योजनानिहाय खर्चाच्या तरतुदींवरही सदस्यांनी सुचना केल्या. त्यास समितीने मान्यता दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ यांनी केले. (सागर कुळकर्णी.जळगाव प्रतिनिधी युवा सह्याद्री)]]>