जळगाव: जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी कार्यालयातर्फे मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत आहेत. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १०७८ गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या गावातील ८१ हजार २२६ जमिनींचे मृद नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंत ३ लाख २३ हजार ७८६ मृद आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या आहेत. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करणे. मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे. जमिनीचे मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी, सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे. क्षमता वृध्दी, कृषि शाखेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि भारतीय कृषि संशोधन अनुसंधानाबरोबरच राज्यातील कृषि विद्यापीठांशी सुसंगत सहभागाने मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपध्दतीत सुधारणा घडवून आणणे. जमीनीच्या उत्पादकतेषियीच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृद नमुने काढण्याच्या व तपासणीच्या पध्दतीमध्ये समानता आणणे व निर्धारित जिल्ह्यांमध्ये तालुका, परिमंडळस्तरीय खतांच्या शिफारशी विकसित करणे. हा या कार्यक्रमाचा प्रमूख उद्देश आहे. या कार्यक्रमात सार्वाधिक जामनेर तालुक्यातील १०८ तर अमळनेर तालुक्यातील १०२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर चाळीसगाव व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी ३३ हजार ८१९ तर जामनेर तालुक्यातील ३० हजार ३०४ शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. मृद नमुने तपासणीकरीता जिल्ह्यात शासकीय प्रयोगशाळेसह जिल्ह्यातील सहा खाजगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. या प्रयोगशाळांमध्ये ९६ हजार ७५० मृद आरोग्य पत्रिकेसाठी आवश्यक घटकांसाठी मृद नमुने तपासण्याची क्षमता आहे. यावर्षीही जिल्हयातील ७५० गावांमधील ३१ हजार २४६ बागायती तर ३१ हजार ४९६ जिरायती मृद नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी ११ हजार ६२९ मृद नमुने तपासण्यात आले आहे. तर ६ हजार २१९ तयार मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. मृद आरोग्य पत्रिकांमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या आरोग्याविषयी इत्यंभुत माहिती मिळणार आहे. तसेच जमिनीत घ्यावयाच्या पीक पध्दतीबाबतही मार्गदर्शन होण्यास मदत होणार असून जमिनीची उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.]]>