जळगाव, दि.११– जिल्ह्यात डेंग्यु तापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधाकरीता प्रभावी उपाय योजना राबवाव्यात. त्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना दिले. तसेच डास प्रादुर्भावाच्या प्रभावी नियंत्रणासाठी येत्या मंगळवार दि.१५ पासून जिल्ह्यात किटकजन्य रोग प्रतिबंधक पंधरवाडा राबवून उपाययोजना कराव्या, असे निर्देशही श्रीमती अग्रवाल यांनी आज दिले. जिल्ह्यात डेंग्युचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना दिसून येत असल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतला.या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. बी. ठाकूर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा उगले आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील संशयित डेंग्यु रुग्णांचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार महापालिका क्षेत्रात ४७ पैकी २६ जणांचे रक्त नमुने दुषित आढळले आहेत. तर तालुका शहरी क्षेत्रात ५१ पैकी ३४ जणांचे रक्त नमुने दुषित आढळले. तर ग्रामीण क्षेत्रात ३७ पैकी १२ जणांचे रक्त नमुने दुषित आढळले आहेत. सद्यस्थित सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती चांगली आहे, असे सांगण्यात आले. डास प्रतिबंधासाठी जळगाव महानगरपालिका आणि मनपा क्षेत्र वगळता जिल्ह्यातील अन्य शहरी व ग्रामिण भागात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्यानुसार जळगाव महानगरपालिका क्षेत्रात ताप सर्वेक्षण करुन किटक सर्वेक्षणही करण्यात येत असते. तसेच रुग्ण व त्यांच्या समवेत राहणाऱ्या लोकांचे रक्तनमुने घेणे, त्या त्या परिसरात डास अळी नाशकाचा वापर करणे, डासांची घनता नष्ट करण्यासाठी धुरफवारणी आदी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी महानगरपालिकेने २०० कर्मचाऱ्यांची १० पथके तयार केली आहेत. तसेच प्रत्येक वार्डनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी मिळून सर्वेक्षण पूर्ण केले जात आहे. ग्रामीण भागात व मनपा वगळता अन्य शहरी भागात एकात्मिक सर्वेक्षण, किटक व्यवस्थापन यावर भर देण्यात येत आहे. किटकजन्य आजारांबाबत माहिती देण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येत असून दर मंगळवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. दर बुधवारी गावांत स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. दर गुरुवारी अळीनाशकाचा वापर केला जात आहे, डास अळी भक्षक गप्पी मासे डास उत्पत्तीच्या ठिकाणी सोडण्यात येऊन डासांचा प्रतिबंध करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी १५ नोव्हेंबर पासून किटकजन्य रोग पंधरवाडा राबविण्याचे निर्देश दिले. हा कार्यक्रम जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याअंतर्गत येणारे ११२ वैद्यकीय अधिकारी तसेच न.पा. , मनपा व ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये या क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशा सुचना त्यांनी केल्या. तसेच डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जैविक नियंत्रणावर भर द्यावा. लोकांना दैनंदिन जीवनात मच्छरदाणीचा वापर करणे, अंग झाकले जाईल असे कपडे वापरणे, डास पळविणाऱ्या औषधांचा वापर करणे आदींबाबत प्रबोधन करावे, असेही त्यांनी सांगितले. ( सागर कुळकर्णी, जळगाव युवा सह्याद्री )]]>