नेरूळमध्ये नामांकित शोरूम कंपन्यांनी ढापले पालिकेचे पदपथ

नवी मुंबई, नेरूळ:- नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर १ मधील मोटारसायकल आणि कार शोरूम कंपन्यांनी फार मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाचे पदपथ ढापले असून महानगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.

नेरूळ सेक्टर १ मध्ये निस्सान, इन्फिनिटी कार्स बीएमडब्ल्यू, महिंद्रा, होंडा, टाटा मोटर्स, भावना फोर्ड यासारख्या नामांकित मोटारसायकल आणि कार शोरूम कंपन्यांनी महानगर पालिकेच्या पदपथावर फार मोठे अतिक्रमण करून पालिकेचे पदपथ गिळंकृत केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगर पालिका प्रशासनाने लाखो-करोडो रुपये खर्च करून रस्ते आणि पदपथ बनविले आहेत. परंतु महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे नागरिकांना प्रत्यक्ष या पदपथांचा वापर करता येत नसल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे. स्वतः ची खाजगी मालमत्ता असल्यासारखे शोरूम मालकांनी या ठिकाणी पदपथावर फार मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांची येथे प्रचंड गैरसोय होत चालली आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे अवघड होत असल्याने येते किरकोळ अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. अनेकदा तक्रारी करूनही महानगर पालिका प्रशासनातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांचे शोरूम कंपन्यांशी लागेबांधे असल्याचा आरोप नागरिकांकडून उघडपणे केला जात आहे. गोरगरीब झोपडपट्टी वासियांच्या अनधिकृत झोपड्यांवर वेळोवेळी कारवाई करणारी महानगर पालिका प्रशासन मात्र या शोरूम कंपन्यांच्या अतिक्रमानापुढे गप्प का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या शोरूम कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे सचिव विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांनी महानगर पालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडे यापूर्वी एकदा निदर्शनास लेखी निवेदन पत्राद्वारे आणून दिली होती. तसेच या शोरूम कंपन्यांवर पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणीसुद्धा विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांनी पालिकेकडे लेखी निवेदन पत्राद्वारे केली होती. परंतु, पालिका प्रशासनाने मात्र निवेदन पत्राला नेहमी केराची टोपली दाखवली असल्याचे समजते. या अतिक्रमणाबाबत पालिकेचे नेरूळ विभाग कार्यालयाचे विभाग अधिकारी राजेंद्र सोनावणे यांना विचारले असता त्यांनी या शोरूम कंपन्यांना पालिकेच्या नोटीसा दिल्या असल्याचे सांगण्यात आले. 

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *