नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा यांच्या विक्रीसाठी हिंदु देवता अथवा हिंदूंचे धार्मिक ग्रंथ यांच्या नावांचा वापर करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता दिल्यास जनतेच्या संवेदनक्षमतेवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन्.व्ही. रामन् यांच्या खंडपिठाने म्हटले आहे. रामायण, कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहिब असे अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एखादी व्यक्ती वस्तू अथवा सेवा यांच्या विक्रीसाठी अशा धार्मिक ग्रंथांचा ट्रेडमार्क म्हणून वापर करू शकत नाही असेही पीठाने स्पष्ट केले आहे. हिंदु देवतांच्या नावांचा वापर उत्पादनांची विक्री करण्यासाठी करता येणार नसल्याचे भारतीय कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे, असेही पीठाने या वेळी सांगितले. पाटलीपुत्र (पाटणा) येथील लालबाबू प्रियदर्शी यांनी उदबत्त्या आणि सुगंधी द्रव्ये यांच्या विक्रीसाठी रामायण हा ट्रेडमार्क वापरण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली.]]>