"मराठी भाषा समृद्ध आणि चिरंतन" मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ना.धों.महानोर यांचे प्रतिपादन

जळगाव (सागर कुळकर्णी)– मराठी भाषा धोक्यात आहे, असा व्यर्थओरडा करणाऱ्यांनी मराठवाडा, वऱ्हाड, खान्देश या भागात बोलीभाषांनी समृद्ध झालेली मराठी भाषा अनुभवावी, तिथलं जीवन अनुभवावे, हीच बोलीभाषा मराठीचं बलस्थान आहे, आणि म्हणूनच मराठी समृद्ध आणि चिरंतन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी , साहित्यिक ना. धों. महानोर यांनी आज येथे केले. येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘बोलतो मराठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कविवर्य ना. धों. महानोर हे आपले विचार मांडत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील हे उपस्थित होते. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे, माजी कुलगुरु डॉ. के.बी.पाटील, विद्यापिठाचे कुलसचिव प्रा. ए. बी.चौधरी, महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभागाचे संचालक डॉ.माहुलीकर, डॉ. सुधीर भटकर, प्रा. सत्यजीत साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर उर्फे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. तुपे यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. महानोर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, कुसुमाग्रज यांच्या साहित्यात समग्र देशाला आवाज देण्याची ताकद होती. त्यांची कविता समाजासाठी दीपस्तंभ ठरली. त्यांच्या साहित्यात माणूस हा केंद्रबिंदू होता. भाषेची ताकद कुसुमाग्रज यांनी नटसम्राट या नाटकातून दाखवून दिली. मराठी भाषेसाठी त्यांनी सातत्याने विचार केला. त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा होत असल्याबद्दल महानोर यांनी आनंद व्यक्त करून मराठीतील दर्जेदार साहित्य इतर भाषांमधून अनुवादीत व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करायला हवी असे सांगुन त्यांनी मराठी भाषेत व्याकरणाचे महत्व अधोरेखीत केले. मराठी साहित्याची थोरवी मराठी भाषेच्या साधेपणात आहे. जीवनाशी जोडलेली माणसे या भाषेत लिखाण करतात म्हणून ही भाषा समृद्ध आहे आणि या साहित्यावर पोसलेला इथला माणूसही समृद्ध आहे. यावेळी श्री. महानोर यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या आठवणींनाही आपल्या भाषणातून उजाळा दिला. अध्यक्षीय समारोप कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांच्या भाषणाने झाला. ते म्हणाले की, मराठी ही मातृभाषा जीवनात महत्वाची असल्याचे सांगुन आपल्याला चांगले व्यक्त होता येते ते मातृभाषेतच. त्यामुळे ही मातृभाषा आपण ज्या-ज्या क्षेत्रात जावू त्या क्षेत्रात नेण्याचे आवाहन केले. इंग्रजीचा द्वेष करू नका मात्र जिथे शक्य आहे तिथे मराठीचा वापर करा असेही कुलगुरुंनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. आशुतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमास जळगाव शहरातील नागरिक, साहित्यिक, साहित्यप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनानंतर नाशिकच्या दीपक मंडळाने ‘बोलतो मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मराठी भाषेचा झालेला विकास हा संत पर्व, पंत पर्व, तंत पर्व, आधुनिक काव्य, आधुनिक गद्य, संगीत नाटक आणि आधुनिक नाटककार याद्वारे कसा झाला हे या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे दाखविण्यात आले ७० नामवंत कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *