मुंबई(महेश कुलकर्णी): स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधाकर देशपांडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे स्वातंञ्यवीर सावरकर यांचे प्रखर अनुयायी हरपल्याची प्रतिक्रिया स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. अरुण जोशी यांनी दिली आहे. नागपूर येथून एम. ए. (इंग्रजी) पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद, जालना, नांदेड येथील महाविद्यालयांतून अध्यापक म्हणून काम केले. प्राचीन भारतीय राज्यसंस्था या विषयावरील प्रबंधामुळे मराठवाडी विद्यापीठाची त्यांना पीएच. डी. पदवी मिळाली. सावरकर साहित्याचा विशेष अभ्यास, सावरकरांचे आठवावे विचार, हिंदुत्व दिशा आणि दशा, राष्ट्र विचार ऊर्जा, सावरकर दी प्रोफेटिक व्हॉईस, सावरकर आदी ग्रंथांबरोबरच त्यांनी सावरकर विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभर व्याख्यानं देण्याचे व्रत अंगीकारले. अनेक वृत्तपत्र व नियतकालिकांतून त्यांनी सावरकरांच्या विचारांसंबंधी लेख लिहले. सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारकाच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला तसेच सावरकरांविषयी नरहर कुरुंदकर यांच्याबरोबर वाद प्रचंड गाजला. त्यामुळे नरहर कुरुंदकर यांना माफी मागावी लागली होती. स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्षपदी असतानाही त्यांनी सावरकरांच्या विचारांना अधिक प्रभावीपणे रुजविण्यासाठी विशेष कार्य केले. त्यांच्या निधनामुळे एक अभ्यासू, अनुभवी आणि प्रखर राष्ट्रवादी मार्गदर्शक हरपल्यामुळे सावरकर भक्तांमध्ये एकच हळहळ व्यक्त होते आहे.]]>