नेरूळ, नवी मुंबई: नेरूळ सेक्टर दोन येथील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दारू पिण्याचे प्रमाण वाढीस लागले असून इतरही अनैतिक प्रकार होत आहेत. शेतकरी कामगार पक्षचे नवी मुंबई जिल्हा सेक्रेटरी विरेंद्र (गुरू) म्हात्रे यांनी या उद्यानात महापालिका आयुक्तांकडे सुरक्षारक्षक नेमण्याची तर नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे उद्यानात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी एका लेखी निवेदनातून केली आहे. या उद्यानात दारू पिण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढीस लागले असून सकाळी व संध्याकाळी उद्यानात फिरावयास येणाऱ्या रहीवाशांना उद्यानात दारूच्या बाटल्या पहावयास मिळत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक जण येथे खुलेआमपणे दारू पिण्याचा कार्यक्रम करत असतात. काही दिवसापूर्वीच उद्यानालगत उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकारही घडला होता. या उद्यानाशेजारी सिडकोची इंद्रधनुष्य ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीतील रहीवाशांनाही उद्यानात होत असलेल्या गैरप्रकाराचा त्रास होत आहे. महापालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमल्यास व नेरूळ पोलिसांनी गस्त वाढविल्यास उद्यानात सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा बसणे शक्य होणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महापालिकेला व पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.]]>