मुंबई : नवी मुंबईसह कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या टप्पा एक व टप्पा दोनच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जपानचे परिवहन जमीन पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री किशी इशी यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि कंत्राटदार यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी भारतातील जपानच्या दूतावासाचे वित्तीय आणि विकासमंत्री केनको सोने, मुंबईतील जपानचे वाणिज्य दूत रोजी नोदा, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीचे (जायका) भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी ताकायोशी तांगे आदी उपस्थित होते. एमटीएचएल या प्रकल्पासाठी जायका कर्ज स्वरूपात निधी पुरविणार आहे. हा एकूण दोन 2.8 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 17 हजार 843 कोटी रुपये) प्रकल्प आहे. त्यापैकी 85 टक्के म्हणजेच सुमारे 15 हजार शंभर कोटी रुपये जायका एमएमआरडीएला देणार आहे. टप्पा एक हा 10.38 कि.मी. चा असून त्याचे बांधकाम एल अँड टी आणि आयएचआय, जपान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 767 कोटी रुपये खर्च येणार आहे. टप्पा 3 हा 3.60 कि.मी. चा असून बांधकाम एल अँड टी करणार आहे त्यासाठी 1 हजार 13 कोटी 79 लाख रुपये खर्च होणार आहे. याप्रसंगी एमएमआरडीए आणि एल अँड टी आणि आयएचआय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी एल अँड टी च्या अवजड नागरी पायाभूत सुविधा व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख एस. व्ही. देसाई, आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं.लि.चे अध्यक्ष ताकेशी कावाकामी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे तसेच संजय खंदारे आदी उपस्थित होते. साभार: महान्यूज]]>