मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसार माध्यमातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध निर्णयांची, योजनांची, कार्यक्रमांची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमांद्वारे करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असते. यासाठी महासंचालनालयाच्या वृत्त शाखा, महान्यूज, प्रकाशने, प्रदर्शने, वृत्तचित्र, संशोधन, आस्थापना तसेच लेखा शाखा अशा विविध शाखा कार्यरत आहेत. या शाखांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी जनसंवाद, जनसंपर्क, जाहिरात, फाईन आर्टस्, दूरदर्शन कार्यक्रम निर्मिती, चित्रपट निर्मिती यातील पदवी/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी 3 महिने एवढा असेल. यशस्वीरित्या इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना महासंचालनालयातर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतील. या इंटर्नशिप उपक्रमासाठी विद्यावेतन लागू नाही. पुर्वानुभव असलेल्या व उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेश परीक्षा/मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. तरी इच्छुकांनी स्वत:चे संपूर्ण नाव, जन्म दिनांक, शैक्षणिक पात्रता, पुर्वानुभव, कुठल्या शाखेत अनुभव घेण्याची इच्छा आहे, स्वत:चा पत्रव्यवहाराचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल), पासपोर्ट छायाचित्र प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती आदी माहितीसह महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक 022-22024961 व ईमेल dlo2.dgipr@maharashtra.gov.in या पत्यावर दि. 5 जुलै 2016 पर्यंत अर्ज करावा. Courtesy: Bharat Satya (भारत सत्य न्युज, मुंबई) bharatsatyanews@gmail.com http://twitter.com/bharatsatyanews]]>