मुंबई: आजच्या नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओच्या डिजिटल जगातही पारंपरिक एकांकिकेची परंपरा जपणाऱ्या मुंबई येथील चिंतामणी कलामंचाने परेल येथील दामोदर हॉलमध्ये आयोजित खासदार करंडक – राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडली. राज्यभरातून विविध ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांमधून अंतिम पाच एकांकिकांमध्ये चांगलीच चुरस रंगली. यात विक्रम पाटील यांच्या देव हरवला या एकांकिकेने प्रथम क्रमांक फटकावला.
चिंतामणी कलामंचाचे अध्यक्ष प्रथमेश पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत दर्दपोरा, लज्जा द्यावी सोडून, पैठणी, मिंग्लिश, देव हरवला या सर्वोत्तम पाच एकांकिकेमध्ये अंतिम फेरी रंगली. पाचही स्पर्धकांनी आपली सर्वोत्तम कला पेश करीत गुरुदत्त लाड, श्रीनिवास नार्वेकर, समीर पेणकर या परीक्षकांना चांगलेच खुश केले. उपस्थित प्रेक्षकांनीही पाचही एकांकिकेचा मनोसोक्त आनंद घेतला. राहुल बेलापूरकर लिखित देव हरवलाने प्रथम क्रमांक तर दर्दपोरा या एकांकिकेने द्वितीय क्रमांकाचा मान फटकावला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विक्रम पाटील, सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून राहुल बेलापूरकर, सर्वोत्कृष्ट संगीतासाठी निनाद म्हैसाळकर यांनी तर सर्वोत्कृष्ट स्त्री पात्रासाठी कोमल सारंगधर (भूमिका मुस्कान) यांनी वैयक्तिक पारितोषिके फटकावत इथेही वर्चस्व गाजवले. तर सर्वोत्कृष्ट पुरुष पात्रासाठी लज्जा द्यावी सोडून या एकांकिकेच्या नवऱ्याच्या भूमिकेसाठी अजय पाटील यांनी बक्षीस फटकावलं. कार्यक्रमासाठी विशेष अथिती म्हणून श्री तुकाराम मोकल यांची उपस्थिती लाभली.
]]>