मुंबई(महेश कुलकर्णी): स्वातंञ्यवीर सावरकर यांच्या विरोधात निराधार व चुकीचा मजकूर प्रसिद्ध करून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने लिखाण केल्याबद्दल `द वीक’ या साप्ताहिकाच्या विरोधात स्वातंञ्यवीर सावरकर यांचे नातू व स्वातंञ्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भोईवाडा येथील न्यायालयात फौजदारी दावा केला होता. काल दिनांक १० जानेवारीला सुनावणी नंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जे. बियाणी (पाचवे न्यायालय) यांनी या संदर्भात दंडसंहितेच्या कलम ३४, ५०० आणि ५०२ अंतर्गत `द वीक’ची मल्याळम मनोरमा ही प्रकाशन संस्था, व्यवस्थापकीय संपादक फिलीप मॅथ्यू, प्रकाशक जॅकोब मॅथ्यू, संपादक टी. आर. गोपाळकृष्णन व मजकूर लिहणारे प्रतिनिधी निरंजन टकले यांच्याविरुद्ध दावा दाखल करून घेत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. ‘द वीकने’ २४ जानेवारी २०१६ च्या अंकात जाणीवपूर्वक खोडसाळपणे स्वातंञ्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध केला होता. त्यातील प्रत्येक मुद्यांचे खंडण रणजित सावरकर यांनी सप्रमाण केले आहे. इतिहास संशोधनाच्या नावावर लेखकाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून एका क्रांतिकारकाचा अपमान केल्यामुळे एकच खळबळ माजली होती. असामान्य व धैर्यशाली व्यक्तीवर चिखलफेक करण्यात आल्यामुळेच हा दावा स्वतः रणजित सावरकर यांनी दाखल केला होता. देशाच्या स्वातंञ्य चळवळीविषयी चुकीचे दाखले देऊन नव्या पिढीमध्ये हा दैदिप्यमान इतिहास चुकीच्या पद्धतीने रुजविण्याच्या या कृतीविरोधात त्यांनी सादर केलेला दावा न्यायालयाने दाखल करून घेतला आहे. स्वातंञ्यवीर सावरकर यांचा तिरंगा ध्वजाला विरोध होता, सुटकेनंतर त्यांनी काहीच देशकार्य केले नाही, त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, ते गांधीवधात सहभागी होते, सुटकेसाठी त्यांनी माफी मागितली, अशा स्वरुपाचे आरोप करत ‘द वीकने’ अनेक चुकीचे व आणि संदर्भहीन दाखले देत केले होते. त्याबाबत रणजित सावरकर यांनी जाहीरपणे खुलासा करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळेच अखेर न्यायालयीन कारवाई करावी लागली होती.]]>